| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर माणगाव गावच्या हद्दीत असलेल्या गोट फार्म मध्ये आग लागली. या आगीमध्ये तब्बल 400 बकऱ्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात या ठिकाणी लागलेली आग हि रात्रीच्या वेळी लागल्याने मदतकार्य मिळण्यात अडचणी आल्या आणि मुख्य प्राण्यांचा बळी यात गेला आहे.
कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ जवळील माणगाव गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला राबीया बकरी फार्म आहे. माणगाव येथे मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री सुमारे 1.30 ते 2 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून या दुर्घटनेत सुमारे 300 ते 400 बकऱ्या होरपळून मृत्युमुखी पडल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मध्यरात्री फॉर्म परिसरातून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही मिनिटांतच आग बकरी पालन करण्यासाठी उभारलेल्या शेड्समध्ये पसरली. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की बकऱ्यांना बाहेर काढण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. परिणामी मोठ्या संख्येने मुक्या प्राण्यांचा दुर्दैवी अंत झाला.
फार्म मालकाच्या म्हणण्यानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विद्युत वाहिन्यांमध्ये झालेल्या बिघाडामुळे ठिणग्या पडून आग भडकली असावी.घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीस धाव घेतली , मात्र तोपर्यंत फॉर्मचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र बकरी पालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. महसूल व पशुसंवर्धन विभागाकडून पंचनामा सुरू असून नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे.





