। पेण । प्रतिनिधी ।
पेण- वाशी नाका येथे गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला अचानक भीषण आग लागल्याची घटना आज दि. 22 घडली. या आगीदरम्यान सिलिंडरचे एकामागून एक स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तातडीने बंद केली होती.
घटनेची माहिती मिळताच जे.एस.डब्ल्यू. स्टील कंपनी आणि पेण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही तासांतच आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी, खबरदारी म्हणून घटनास्थळी ‘कूलिंग’ (थंडावा देण्याचे काम) प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा टेम्पो ग्रामीण भागात घरगुती वापराचे सिलिंडर पोहोचवण्यासाठी जात होता. या अपघातामुळे संबंधित भागातील सिलिंडर पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सुदैवाने, या आगीत जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही, मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.





