| मुंबई | प्रतिनिधी |
बोरिवली मेट्रो स्टेशनजवळ भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बोरीवली पूर्वमधील देवीपाडाजवळ ही घटना घडली आहे. याठिकाणी एका खासगी बसला भीषण आग लागल्याचे माहिती समोर आली आहे. आग लागल्याचे कारण अद्याप समोर आले नसून याबाबत तपास सुरु करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न दलाकडून सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीतील कस्तुरबा पोलीस ठाणे हद्दीत देवीपाडा मेट्रो स्टेशनखाली एका ट्रॅव्हल्स बसने अचानक पेट घेतला. नॉर्थ बाँडवर शॉर्ट सर्किटमुळे खासगी बसला ही आग लागली. अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे बस पूर्णपणे जळून खाक झाल्याचे समोर आले. दरम्यान, तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तसेच बसला आग लागल्याने आगीचे लोट मेट्रो स्टेशनवर पसरलेले होते.







