आसनपोई मधील सद्विचार वाचनालायचे महापुरात मोठया प्रमाणात नुकसान

| महाड | प्रतिनिधी |
अतिवृष्टी आणि महापुराचा महाड तालुक्यातील आसनपोई मधील सद्विचार वाचनालयाला फटका बसला आहे. महापुरामुळे वाचनालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाचकांचे हक्काचे व्यासपीठ पुन्हा उभे राहणे आवश्यक आहे, तरी या दृष्टीने सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे तसेच काही दानशूर व्यक्तिंनी पुस्तक स्वरूपात देखील मदत करावी असे मत वाचनालयाचे सदस्य परेश सोनावळे यांनी व्यक्त केले आहे.

आसनपोई ला वाचकांची मोठी परंपरा आहे. वाचनालयामध्ये मोठ्या प्रमाणात वाचक आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी येऊन पुस्तके वाचत असतात. ही परंपरा सोशल मीडियाच्या दुनियेत देखील अजूनही चालू आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरात वाचनालयाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
या वाचनालयातील १२ हजार पुस्तके, १ कम्प्युटर, इन्वर्टर व फर्निचरचे नुकसान झाले असून ते पुन्हा उपयोगात येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत या वाचनालयाचे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पुन्हा या वाचनालयात येऊन वाचकांना वाचनाची संधी मिळावी, यासाठी प्रशासनाने देखील लक्ष देणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version