करंजा किनारी खारफुटीची सर्रास कत्तल

उरण | वार्ताहर |
उरण मध्ये करंजा टर्मिनल लॉजिस्टिक कंपनीकडून करंजा समुद्र किनारी तसेच बंदरालगतच्या खारफुटीची मोठ्या प्रमाणावर कत्तल सुरु आहे. कंपनीकडून तोडलेली झाडे करंजा – खोपटा खाडीत बेकायदेशीररित्या टाकली जातात अशी खात्रीलायक माहिती मिळताच उरण सामाजिक संस्थेने पत्रान्वये याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी,तहसिलदार उरण,उप वन संरक्षक अलिबाग, वनक्षेत्रपाल कांदळवन अलिबाग यांच्याकडे केली. याची दखल घेऊन तहसिलदारांच्या आदेशानुसार वरील खात्यांचे प्रतिनिधी,कंपनी प्रतिनिधी आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या साक्षीने सदरहू बंदर लगतच्या परिसराची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली.
बंदराच्या पूर्वेकडील बाजूस काही अंतरावर तोडलेल्या खारफुटी झाडांचे सात मोठे ढिगारे समुद्रात पडून आहेत.तसेच बंदराच्या पूर्व बाजूच्या धक्क्यालगत सुमारे 100 मीटर लांब आणि 15 फूट रुंदीच्या भागातील खारफुटीची झाडे तोडून त्या झाडांचा नामोनिशाणा राहू नये म्हणून जेसीबी किंवा तत्सम यंत्राच्या सहाय्याने तो भाग पूर्ण खोदलेला आहे असे दिसून आले आहे . परंतु त्याच भागाला लागून असलेल्या दक्षिणेकडील बाजूस सुमारे 100 खारफुटीच्या तोडलेल्या झाडांचे बुंधे दिसून आले.सदरहू तोडलेली झाडे टगच्या सहाय्याने समुद्रात फेकली जातात त्यामुळे मच्छिमारांचेही नुकसान झाले आहे असेही संस्थेने अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले . तसेच बंदरात साठवलेल्या कोळशाच्या ढिगार-यातून काळे पाणी झिरपून समुद्रात सोडले जात आहे. असेही निदर्शनास आले. सदरहू स्थळ पाहणीचा पंचनामा झालेला आहे.

Exit mobile version