कर्तृत्ववान व्यक्तींचा कोव्हीड योध्दाने सन्मान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोना काळात जिल्हा रुग्णालय अधिक सक्षम करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून महिला आघाडी प्रमुख तथा नगरसेविका चित्रलेखा पाटील यांच्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास एक कोटी रुपयांचे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये विविध साहित्य, आयसीयु बेड, ऑक्सिजन आदींचा समावेश असल्याची माहिती चित्रलेखा पाटील यांनी दिली.
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करणार्या अलिबागमधील आठ कर्तृत्ववान व्यक्तींना कोव्हिड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अलिबागमधील मुजफ्फर चौधरी उर्फ मोदी भाई मित्र मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम माजी आमदार ना. का भगत यांच्या निवासस्थानी शुक्रवारी पार पडला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, अलिबाग नगरपालिकेचे नगरसेवक अनिल चोपडा, समाजसेवक रवि थोरात, संजय कांबळे, बंड्या मुकादम, सागर पेरेकर आणि मावळा प्रतिष्ठानचे मानस कुंटे या आठ व्यक्तींचा सन्मान कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त किरीट गांधी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कस्टम विभागाचे अधीक्षक जयवंत झोपे, रायगड जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, माजी नगरसेवक कविता ठाकूर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी आपत्कालीन परिस्थितीत मदत करणार्या सर्वांचेच कौतुक केले. तर दिलीप भोईर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले-
कोव्हिड योद्धांनी रुग्णांना भोजन देण्यापासून त्यांना वेळेवर उपचार मिळावे, यासाठी मेहनत घेतली. ज्या रुग्णांना उपचार घेताना अडचणी निर्माण होतात. त्या रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी वारंवार रुग्णालयातील डॉक्टरांसोबत संवाद साधून मदत करण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण व शहरी भागात कोरोना काळात आर्थिक व्यवहार बंद पडल्याने गरजूंना अन्न धान्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीचा हात देण्यात आला. गावे, वाड्यांमध्ये स्वतः जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. कोरोनामुक्त गावांसाठी कोव्हीड सेंटर उभारणीपासून गावे, वाड्यांमध्ये निर्जूंतकीकरण करण्यावर भर देऊन कोरोनाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे त्याचा सन्मान करण्यात आला.