| माथेरान | वार्ताहर |
माथेरान हे असे एकमेव सुंदर पर्यटनस्थळ आहे की याठिकाणी एकदा आलेली व्यक्ती वारंवार पर्यटनासाठी हमखास येणार अशीच काहीशी या छोट्याशा गावाची ख्याती आहे. त्यामुळेच इकडे येण्याचा मोह ऐन वृद्धापकाळात सुध्दा होत असल्याचे इथे पर्यटनाला येणारी वयोवृद्ध मंडळी आवर्जून सांगत असतात. अन्य पर्यटनस्थळ ठिकाणी मोटार वाहनांची वर्दळ असते त्यामुळे प्रदूषण आणि कर्कश आवाज येत असतो. त्यावेळी अनेकदा आपण शहरात असल्याचा भास होतो. परंतु माथेरान त्याला अपवाद आहे. कारण याठिकाणी घोडा आणि मानवचलीत हातरीक्षा हीच सध्यातरी प्रमुख वाहने पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. केवळ माथेरानशी नाळ जुळलेली असल्यामुळे वर्षोनुवर्षे पर्यटकांना हे ठिकाण नेहमीच मोहित करते त्यामुळेच त्यांची पाऊले आपसूकच इकडे वळतात.
मुंबई येथून आलेल्या पल्लवी बडगुजर यांनीही माथेरान आवडत असल्याचे नमूद केले. त्या म्हणाल्या की, जवळपास तीस वर्षांपूर्वी आम्ही याठिकाणी आमच्या लहान लहान मुलांना सोबत घेऊन आलो होतो. वृद्धापकाळाने आम्हाला चालणे जमत नाही. व्हीलचेअर वर बसून आम्हाला आमची मुले इकडे फिरावयास घेऊन येतात ते केवळ आम्ही त्याच्याजवळ हट्ट धरतो की चला माथेरानला. काही दिवसांपूर्वी इथे ई-रिक्षा सुरू झाली आहे असे समजले होते. म्हणून आमच्या मुलांनी आम्हाला इकडे आणले परंतु अद्यापही ई रिक्षा सुरू झाली नाही त्यामुळे आजही आम्हाला नाईलाजाने व्हीलचेअरवर बसून यावे लागते आणि महत्वाच्या ठिकाणी हातरीक्षा मधून प्रवास करावा लागत आहे. असे त्या म्हणाल्या.
इथे पर्यावरणीय दृष्टीने ई-रिक्षा सारखा सुंदर प्रकल्प मार्गी लागणार आहे हे खूपच कौतुकास्पद आहे. यामुळे इथे आमच्या सारखी जेष्ठ मंडळी मोठया प्रमाणावर नक्कीच भेट द्यायला येतील यात शंकाच नाही. लवकरच इथे ही वाहतुकीची व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. अशी अपेक्षाही त्यानी व्यक्त केली.