वर्षा सहलीसाठी माथेरान बेस्ट

। माथेरान । वार्ताहर ।

अनेकांना उन्हाळ्यात कामाच्या, व्यवसायाच्या दगदगीतून उसंत मिळत नाही. त्यामुळे निदान पावसाळ्यात तरी वेळात वेळ काढून मनाला आलेली मरगळ आणि शिणता घालवण्यासाठी अगदी जवळचेच रमणीय पर्यटनस्थळ म्हणून माथेरान पर्यटनस्थळाला अधिकाधिक पसंती दिली जाते. काय तो इथला पाऊस…काय ती थंड हवा…काय ते धबधबे…असे म्हणत निसर्गप्रेमी पर्यटक वर्षा ऋतूत आपला मोर्चा माथेरान पर्यटनस्थळी वळवताना दिसणार आहेत.

जिल्ह्यातील अनेक धबधब्यांवर मद्यधुंद युवकांचा गदारोळ सर्रासपणे पहावयास मिळतो. पावसाळ्यामध्ये अनेक नदी नाल्यांवर दारूच्या नशेत अतिउत्साही तरुणांना पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडतात. या घटनांना आळा बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाने अनेक ठिकाणी बंदी घातली आहे.त्यामुळे आपले निसर्गप्रेम अबाधित ठेवण्यासाठी बहुसंख्य पर्यटक हे माथेरान पर्यटनस्थळाला पहिली पसंती देतात. पुढील महिन्यांपासून सुरु होणार्‍या वर्षा सहलींसाठी माथेरानच बेस्ट असल्याचे बोलले जाते. माथेरानमध्ये जरी धबधबे नसले तरीसुद्धा पायी चालत येताना घाट रस्त्यात लागणार्‍या धबधब्यांवर मनसोक्तपणे भिजण्याचा आनंद घेणारे युवा निसर्गप्रेमी माथेरानला येत असतात. माथेरान शहरात दाखल झाल्यावर येथील पावसाच्या गारेगार पाण्यात पदभ्रमण करताना भिजण्याचा जो नैसर्गिक आनंद मिळतो तो तर अगदी विरळच असतो. भिजत भिजत पॉईंटवरील निसर्गरम्य स्थळे न्याहाळत असताना दाट धुक्यातून समोरची अलौकिक, अद्भुत व अवर्णनीय दृश्ये डोळ्यात साठवून आपल्या मोबाईलच्या कॅमेर्‍यात टिपण्यासाठी सुद्धा पर्यटकांची एकप्रकारे धांदल उडत असते. काही जवळच्या पॉईंटवर गारव्यात गरमागरम मका खाण्याची मजा तर काही औरच असते. केवळ धबधब्याखाली आंघोळ करण्याची हौसदेखील येथील शारलोट तलावाच्या ओसंडून वाहणार्‍या पाण्याखाली तृप्त होत असते. त्यामुळे तर अनेकजण हे निसर्गाच्या कुशीतील गर्द वनराईमध्ये विसावलेल्या शारलोट तलावाला आवर्जून भेट देतात.

Exit mobile version