पर्यटकांनी माथेरान फुलले

पर्यटनस्थळावर गर्दीचा बहर; घाटात चारचाकींच्या रांगाच रांगा

| माथेरान | वार्ताहर |

वर्षासहलीसाठी पर्यटकांचे हक्काचे आणि आवडते ठिकाण माथेरान आता धुक्यात हरवू लागले असून, येथील पावसाळी पर्यटन हंगाम जोमात सुरू झाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच विकेंडला दहा हजारांच्या वर पर्यटक दाखल झाले होते. नेरळ माथेरान घाटात तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माथेरानचे प्रवेशद्वार दस्तुरी नाक्यावर तर प्रवासी कर भरण्यासाठी पर्यटकांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. येथील मुख्य पॉईंट आणि शहरातील मुख्य रस्ते पर्यटकांनी गजबजलेले दिसत होते. यामुळे येथील सर्व छोटे-मोठे व्यावसायिकदेखील समाधान व्यक्त करीत होते.


ढगांमध्ये अच्छादलेल्या हिरव्यागार पर्वतरांगा, गारेगार वातावरण, हिरवा शालू परिधान केलेली डोंगर रांग व त्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, हिरव्या गर्द वनराईतून जाणारे लाल मातीचे रस्ते, शुद्ध व मोकळी हवा आणि या मान्सून हंगामामध्ये अंगाला झोंबणारा गार वारा या सर्व स्वर्गसुख गोष्टींचा अनुभव मिळावा यासाठी माथेरान पर्यटनस्थळासारखा उत्तम पर्याय नाही. मुंबई व पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले हे पर्यटनस्थळ बाराही महिने पर्यटकांना येथे आकर्षित करीत असते. मात्र, पावसाळ्यात येथे पर्यटक संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.

सध्या राज्यात सर्वत्र पावसाने चांगलाच जोर धरला असून, पावसाळी सहलींचे बेत ठरू लागले आहेत. माथेरानमध्ये सरींवर सरी बरसत आहेत. समुद्र सपाटीपासून 803 मीटर उंचीवर असलेल्या पर्यटनस्थळावर वरुणराजा अगदी मनसोक्त कोसळत आहे. येणारा पर्यटक तर येथे गरमागरम वाफाळलेला चहा, कांदा भजी, मक्याचे कणीस खात या मुसळधार पावसातून पण घोड्यावरून रपेट मारताना दिसत आहेत. काही पर्यटक तर येथे गर्द वनराईतून, धुक्याच्या दुलईमधून पदभ्रमण करताना दिसत आहेत. माथेरानमधील गारेगार वातावरणात व धुक्याची दुलई अनुभवण्यासाठी येथे जुलै महिन्याच्या पहिल्याच विकेंडला दहा हजारांच्या वर पर्यटक दाखल झाले होते. नेरळ माथेरान घाटात तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माथेरानचे प्रवेशद्वार दस्तुरी नाक्यावर तर प्रवासी कर भरण्यासाठी पर्यटकांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. येथील मुख्य पॉईंट आणि शहरातील मुख्य रस्ते पर्यटकांनी गजबजलेले दिसत होते. यामुळे येथील सर्व छोटे-मोठे व्यावसायिकदेखील समाधान व्यक्त करीत होते. तसेच आलेल्या पर्यटकांच्या दिमतीला येथील अश्वचालक, हातरिक्षा चालक आणि व्यावसायिक सज्ज झालेले दिसत होते. आत्ता पुढील पावसाळी तीन महिने येथे पर्यटकांची वर्दळ आणखीन वाढणार आहे आणि या सुंदर पर्यटनस्थळी पर्यटकांचा राबता असणार आहे.

आम्ही मित्र-मैत्रिणी माथेरानला पावसाळी सहलीसाठी आलो होतो. विकेंडमुळे येथे प्रत्येक पॉइंटवर खूप गर्दी दिसत होती. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या माथेरानमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

पप्पू परदेशी, पर्यटक, कल्याण
Exit mobile version