ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत सावंत यांचे नगरपरिषदेला निवेदन
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानला येण्यासाठी अन्य पर्यायी व्यवस्था नसल्याने सध्यातरी नेरळमार्गे माथेरान हाच एकमेव घाटरस्ता उपलब्ध आहे, त्यामुळे अनेकदा पावसाळ्यात या घाटरस्त्यात दरडी कोसळण्याचे प्रकार काही प्रमाणात होत असतात. मुख्य तीन वळणांवर मोठ्या दरडी आहेत, त्या अद्यापही काढल्या नाहीत आणि या धोकादायक भागांना संरक्षक जाळ्यासुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बसविण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे अतिवृष्टीमुळे एखादी दरड कोसळली तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत सावंत यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे यांच्याकडे केली आहे.
माथेरान-नेरळ घाटरस्त्यातील सुटावलेल्या दरडींना संरक्षक भिंत वेळीच घालणे व दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित करणे तसेच या घाटात अनेक ठिकाणी दगड, माती व झुडपांनी भरलेल्या मोर्या व गटारे पावसाळ्यापूर्वी स्वच्छ व साफ करून घ्याव्यात जेणेकरून पावसाचे प्रचंड वाहते पाणी या गटारातून वाहत जाऊन घाटरस्त्याची हानी कमी प्रमाणात होईल.