माथेरान घाट रोखणार

वाड्यांच्या रस्त्यासाठी आदिवासी बांधव आक्रमक

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील माथेरानचे डोंगरात असलेल्या आदिवासी वाड्यांना जाणारा रस्ता वन विभागाच्या अडथळ्यामुळे होत नाही. रस्ता नसल्याने या भागातील आसलवाडी येथील महिला विठाबाई विठ्ठल सांबरी यांचा सर्प दंशाने मृत्यू झाला. त्यानंतर शासनाच्या भूमिकेबद्दल आदिवासी समाजात सापत्नपणाची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, शासनाने जुम्मापट्टी पासून किरवली वाडीपर्यंत रस्ता तयार करावा या मागणीसाठी आदिवासी बांधव रस्ता रोको करणार असून 29 जुलै रोजी नेरळ माथेरान घाटरस्ता रोखण्याचा इशारा दिला आहे.

माथेरान डोंगर रांगेत असलेल्या 13 आदिवासी वाड्या आजही रस्त्यापासून दूर आहेत. स्थानिक आदिवासी रस्त्यासाठी दरवर्षी श्रमदान करतात आणि आपली पायवाट स्वतःच बनवतात. त्यात सर्वाधिक 13 आदिवासी वाड्या या नेरळ माथेरान घाट रस्त्यातून सुरू होणार्‍या डोंगर रांगेतील आहेत. येथील जुम्मापट्टी येथून सुरू होणार्‍या आदिवासी वाड्यांचा पट्टा हा कर्जत शहराजवळील किरवली ग्रामपंचायत हद्दीत राहणार्‍या आदिवासी बांधवांना देखील पक्का रस्ता मिळाला नाही. या पट्ट्यातील 12 आदिवासी वाड्या या साधारण साडे तेरा किलोमीटर अंतरामध्ये असून या मार्गात रस्ता बनविणे अत्यंत सोपे काम आहे. वन जमिनीवर वस्ती करून राहत असलेले हे आदिवासी बांधव वन जमिनीवर 200 वर्षे घरे बांधून राहत असून देखील रस्त्यापासून वंचित आहेत.

माथेरानचे डोंगरातील पाणी या भागातून वाहत जात असल्याने या भागात वन विभागाची हरकत दूर झाली तर दोन वर्षात सर्व सोयींनी युक्त असा रस्ता तयार होऊ शकतो. जमीन वन विभगाची आहे मात्र त्या जमिनीवर झाडे फार अत्यल्प आहेत. केवळ जागा अडवयाची म्हणून वन विभाग आपली हुकूमत येथील आदिवासी बांधवांवर दाखवत असल्याचा आरोप आदिवासी नेत्यांनी केला आहे. वन विभागाची दळी जमीन असल्याने शासनाने कोणत्याही प्रकारचे वनीकरण केले जात असलेल्या या जमिनीवर रस्ते करून देण्याची परवानगी शासन का देत नाही? असा प्रश्‍न आदिवासी सतत विचारत असतात.

कर्जत तालुक्यातील माथेरानचे डोंगरामध्ये असलेल्या आदिवासी वाड्या या चार ग्रामपंचायतींमधील वाड्या आहेत. त्यात माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतीमध्ये बेकरेवाडी तसेच जुम्मापट्टी धनगर वाड्यांचा समावेश आहे. तर आसल ग्रामपंचायतीमध्ये आसलवाडी, बोरीचीवाडी, मना धनगर वाडा, धामणदांड, सागाची वाडी, चिंचवाडी, सागाची वाडी, भूतीवली वाडी, पाली धनगर वाडा, नाण्याचा माळ यांचा समावेश आहे. उमरोली ग्रामपंचायतीमध्ये आषणेवाडी आणि किरवली ग्रामपंचायतीमध्ये सावरगाव वाडी आणि किरवली वाडी यांचा समावेश आहे.त्या रस्त्यावर चार ठिकाणी मोठे नाले असल्याने मोठे पूल आणि 15-20 ठिकाणी साकव बनवून ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रश्‍न निकाली निघू शकतो.त्यात अडथळा ठरत असलेल्या वन जागेचा विषय वनीकरण केले जात असल्याने निकाली निघू शकतो.मात्र शासनाची आणि लोकप्रतिनिधी यांची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे.

शासन माथेरान डोंगरातील जुम्मापट्टी ते किरवली वाडी या भागातील रस्ता तयार करीत नसल्याने आसल वाडीमधील आदिवासी महिला विठाबाई विठ्ठल सांबरी यांचे सर्प दंशाने मृत्यू झाला आहे. त्या भागात आसलवाडी ते बेकरेवाडीपर्यंत रस्ता नसल्याने त्या महिलेला स्थानिक आदिवासी लोकांनी कपड्याची झोळी करून त्यानं वाहून आणण्यात आले. वेळेत रुग्णालयात नेवून उपचार झाले नाहीत आणि त्यामुळे विठाबाई सांबरी यांचे निधन झाले होते. त्यामुळे शासनाच्या विरुद्ध नेरळ माथेरान घाटरस्ता 29 जुलै रोजी रोखला जाणार आहे. तसे लेखी पत्र जैतू पारधी आणि गणेश पारधी यांनी कर्जत तहसीलदार यांना दिलेल्या पत्रात इशारा दिला आहे.

Exit mobile version