। माथेरान । वार्ताहर ।
निसर्गातील साक्षात सुखद अनुभव घेण्यासाठी माथेरान या पर्यटनस्थळा शिवाय पर्याय नाही. काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल असे उदगार असे वाक्य माथेरानला येणार्या प्रत्येक पर्यटकांच्या मुखातून निघत आहेत. पावसाळी पर्यटनासाठी माथेरानला पहिली पसंती दिली जात आहे. आणि त्याच बरोबर माथेरानचा निसर्ग पाहता माथेरानमध्ये नभ उतारू आलं असच काहीसं पर्यटकांना म्हणावं लागत आहे. यामुळे पावसाळी विकेंडमध्ये माथेरान हाऊसफुल्ल होत आहे.
माथेरानमध्ये आल्यावर चिंब भिजलेले असताना एखाद्या टपरीवर गरमागरम मका, भजी, चहाचा आस्वाद हवाहवासा वाटतो. पॉईंटस वरून देखील अनेकदा दाट धुक्यामुळे काही अंतरावरील सुध्दा स्पष्टपणे दिसत नाही सभोवताली नभ उतरले आहेत की काय हा भास आपल्याला हमखास झाल्याशिवाय राहत नाही. त्यातच पायी चालत असताना सुद्धा पॉईंट्स वरील नैसर्गिकरित्या सौंदर्य न्याहाळण्यासाठी एक प्रकारे भूख लागलेली असते. त्यामुळे जराही ग्लानी, थकवा जाणवत नाही. पाय आपोआप पुढे सरकत असतात.
वर्षा ऋतूत मित्र मंडळी सोबत वर्षा सहलीसाठी आल्यावर इथला ओतप्रोत भरलेला निसर्ग पाहून तहानभूक हरपून जाते. मोटार वाहनांना येथे पूर्वीपासूनच बंदी असल्यामुळे एकूणच बावन्न किलोमीटर परिसराची भटकंती करण्यासाठी येथे अन्य स्थळांप्रमाणे यांत्रिक सुविधा अथवा अद्यापही ई-रिक्षाची सोय उपलब्ध नसल्याने कमी बजेट मध्ये येणार्या सर्वसामान्य पर्यटकांना पायी चालत जाणे हा सुद्धा एकमेव पर्याय आहे. मुंबई पुण्याच्या अगदी जवळ असल्याने येथे आत्ताच्या वर्षा ऋतूत सुद्धा सुट्यांच्या दिवशी शनिवार व रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी पहावयास मिळते.