माथेरान हाऊसफुल्ल

निर्बंध शिथिल झाल्याने पर्यटकांची तोबा गर्दी,
घाटरस्त्यात वाहतूक कोंडी,
पाऊण तास रुग्णवाहिका कोंडीत रखडली

नेरळ | कांता हाबळे |
रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी नुकतीच माथेरानचे पर्यटन खुले करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार या शनिवार रविवार पर्यटकांनी माथेरानला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे माथेरान येथील पार्किंग हाऊसफुल्ल झाली. तेव्हा पर्यटकांनी आपल्या गाड्या या घाटरस्त्यात पार्क करून ठेवल्या. परिणामी त्यामुळे आज घाटरस्त्यात वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागला. दरम्यान, वाहतूक कोंडीत अडकलेल्या काही पर्यटकांनी अर्ध्यातून परतीचा रस्ता पकडला तर काहींनी तेथून चालतच माथेरान गाठणे पसंत केले.

मागील वर्षांपासून कोविडचा प्रादुर्भाव असल्याने माथेरान जवळ असूनही पर्यटकांसाठी लांब झाले होते. जगावर आलेल्या कोविडच्या संकटाप्रमाणे येथे सुद्धा कोविडचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे माथेरान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. मागील सव्वा वर्षांपासून माथेरानला पर्यटकांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे केवळ पर्यटकांवर अवलंबून असलेल्या माथेरानकरांची आर्थिक घडी विस्कटली होती. त्यात कोविडची दुसरी लाट ओसरली आणि रुग्णसंख्या देखील खूप कमी झाल्याने येथील पर्यटन सुरु करा अशी मागणी माथेरानकरानी लावून धरली होती. तेव्हा एकंदरीत विचार करत प्रशासनाने माथेरान पर्यटकांसाठी खुले केले. तेव्हा या शनिवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडत माथेरानमध्ये दाखल झाले. एकीकडे धबधवावर पोलिस बंदोबस्त असल्याने सर्व प्रेमी युगल सह मोठ्या प्रमाणात तरुण माथेरान कडे जाण्यासाठी वळाले होते.

माथेरानकडे जाणार्‍या प्रवेश द्वार हुतात्मा चौक येथे नेरळ पोलिसांचा चोख बंदोबस्त होता परंतु,दुपारी अचानक तेथून पोलीस दिसे नासे झाल्याने,तरुणाईने माथेरान घाट फुल होत गेले. माथेरान येथे पार्किंगसाठी मोठी जागा आहे. यात 500 चारचाकी व 400 दुचाकी सामावत अशी जागा असताना देखील पार्किंग फुल्ल झाल्याने पर्यटकांनी आपली वाहने हि घाटरस्त्याच्या दुतर्फा पार्क करून ठेवली. काही पर्यटकांची वाहने दस्तुरी पासून कड्यावरचा गणपती कडे जाणार्‍या रस्त्या पर्यंत म्हणजे 3 किमी वाहने पार्क केलेली होती,त्यात काही आदल्या दिवशी मुक्कामाला आलेल्या पर्यटकांनी वाहने रस्त्यात चुकीच्या पद्धतीने पार्क केल्याने आज विकेंडच्या पर्यटकांची घाटरस्त्यात तोबा गर्दी झाली. तर घाटरस्तात वाहनांच्या गर्दीने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी साधारण एक तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या काही पर्यटकांनी अर्ध्यातून परतीचा रस्ता पकडला. तर पर्यटकांमधील असलेल्या उत्साहाने त्यांनी दमछाक होत असतानाही चालत माथेरान गाठले. दरम्यान माथेरानमध्ये विकेंडला आलेल्या पर्यटकांसाठी वाहतूक नियोजन करणे गरजेचे बनले आहे.


आज माथेरान येथे भारतीय नौदलाचे जवान आपल्या परीक्षेचा भाग म्हणून ट्रेकिंग ला आले होते. त्यांना देखील या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याचदरम्यान रस्त्यावर एक कार हि चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर पार्क करून ठेवली होती. अर्धी रस्त्यावर पार्क असलेल्या या गाडीने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तेव्हा नौदलाच्या जवानांनी रस्त्यावर उतरून चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली वाहने हाताने उचलून बाजूला करत रस्ता मोकळा केला.

ट्रेन बंदचा परिणाम
माथेरान हे मुंबई पुणे या दोन मोठ्या महानगरांच्या मध्यावर आहे. त्यामुळे येथे येण्यासाठी पर्यटक हे उपनगरीय रेल्वे सेवा तसेच ट्रेनचा वापर करतात. मात्र सध्या कोविडचा प्रभाव असल्याने सर्वसामान्य नागरिकांना ट्रेनचा प्रवास निषिद्ध आहे. तर पर्यटन स्थळ असलेले माथेरान खुले झाल्याने याठिकाणी येण्यासाठी पर्यटकांनी वाहनांचा वापर केल्याने याठिकाणी अचानक मोठ्या प्रमाणात वाहने दाखल झाली आणि पार्किंगचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे समजते.

रुग्णवाहिका पाऊणतास रखडली
माथेरान येथून कोवीड संक्रमित रुग्ण अत्यवस्थ असल्याने त्याला घेऊन मुंबई येथे निघाली होती. मात्र अशात दस्तुरी ते कड्यावरचा गणपती रस्ता येथपर्यंत असलेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका तब्बल पाऊणतास रखडून राहिली. रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करण्यासाठी नौदलाच्या जवानांसह टॅक्सी चालक मालक संघटनेच्या चालकांनी देखील मदत केली. त्यामुळे पाऊण तासानंतर रुग्णवाहिका मार्गस्थ झाली.


आम्ही मुंबईवरून माथेरानला विकेंडसाठी आलो होतो. मात्र याठिकाणी वाहतूक कोंडीत आम्ही साधारण 1 तास अडकून पडलो. पण आम्हाला उत्साह आहे. त्यामुळे आम्ही भले दमलो असलो तरी चालत निघालो आहोत. गाडी येईल तेव्हा येईल.
पर्यटक

माथेरान येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत हि चांगली बाब आहे. मात्र वाहतुकीचा प्रश्‍न आज निर्माण झाला होता. याकरिता आम्ही एमपी 93 हा प्लॉट पार्किंसाठी शासनाकडे मागितला आहे. हा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. तेव्हा हा प्लॉट मिळाल्यास पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध होईल. तसेच तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाची पार्किंगची व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान नगरपरिषद

Exit mobile version