पर्यटकांनी माथेरान सजले

। माथेरान । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक दिवाळी हंगामासाठी मोठया संख्येने येत असतात. या आठवड्यात दिवाळी पर्यटन हंगामाला सुरवात होत असून माथेरान हे पर्यटकांच्या स्वागतासाठी सजलेले दिसत आहे. व्यवसायिकांकडून पर्यटक हंगामाची तयारी देखील पूर्ण झाली असून सगळेच पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत.

पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेले माथेरान हे पर्यटकांसाठी सज्ज झाले असून, सर्व सामान्यांच्या खिशाला परवडेल असे पर्यटनस्थळ असून,ते अगदी सुरक्षित असल्यामुळे पर्यटकांची पाऊले आपसूक याकडे वळतात. इथली लाल माती, थंडगार वारा, हिरवीगार वनराई,पर्यटकांचे आकर्षण असलेल्या माकडांच्या मर्कटलीला येथील डोंगर-दर्‍या,मनमोहक निसर्ग, सकाळच्या वेळी कानावर येणारा पक्षांचा किलबिलाट, रुबाबदार घोडे या ऐटदार घोड्यांवरून मारलेली रपेट या सर्व गोष्टींचा आनंद फक्त येथेच मिळतो.यामुळे या पर्यटनस्थळाला पर्यटक आवर्जून भेट देत असतात.

आत्ता शाळा, कॉलेज यांना देखील सुट्ट्या पडणार असून या शनिवार,रविवार पासून या दिवाळी हंगामात पर्यटक देखील येथे दाखल होणार आहेत. या विकेंड पासून माथेरान मधील दिवाळी हंगाम सुरू होताच माथेरान मध्ये पर्यटकांची लगबग सुरू झालेली दिसणार आहे.येथील रेल्वे प्रशासन सुध्दा सज्ज झाले असून माथेरान-अमनलॉज-माथेरान शटल सेवा देखील पर्यटकांसाठी सुरळीत सुरू आहे.आणि लवकरच नेरळ-माथेरान-नेरळ मिनिट्रेन सुरू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.तसेच येथील सर्व हॉटेल्स, लॉज, खाद्यगृहे यासर्व ठिकाणी विद्युत रोषणाई केलेली दिसत आहे.

आमच्या हॉटेल्सच्या सर्व रूमची रंग रंगोटीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. यावेळी आम्ही आमच्या सर्व रूम मध्ये स्मार्ट एलईडी टीव्ही सेट सुद्धा नवीन बसविले आहेत. तर या दिवाळी विकेंड मध्ये आमच्या हॉटेलमध्ये येणार्‍या पर्यटकांसाठी लकी ड्रॉ कुपन देखील असणार आहे.पर्यटकांच्या सेवेसाठी आमचा संपूर्ण कर्मचारी वर्ग सज्ज झाला आहे.

– सुधीर जाधव, व्यवस्थापक प्रेमदीप हॉटेल

दिवाळी हंगाम माथेरानकरांसाठी खूप मोठा पर्यटन हंगाम असतो. पावसाळ्यातील सण उत्सव संपल्यावर दिवाळी सण हा खूप मोठा असतो. पर्यटकांची रेलचेल देखील खूपच मोठ्या प्रमाणावर असते. मुंबई पुण्यासह गुजरातचे पर्यटक देखील मोठ्या संख्येने या हंगामामध्ये येथे येतात. या दिवाळी हंगामासाठी लाखो रुपयांचा माल दुकानात भरून दुकाने भरगच्च सजविली आहेत.

-निलेश परदेशी, लेदर बॅगचे व्यापारी
Exit mobile version