। माथेरान । वार्ताहर ।
वर्षाऋतुमध्ये मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या माथेरानसारख्या सुंदर पर्यटनस्थळाची भ्रमंती म्हणजे पर्यटकांना एक पर्वणीच असते. त्यामुळे पर्यटक आवर्जुन हजेरी लावत असतात. अन्य पर्यटन स्थळांच्या तुलनेत केवळ वाहतुकीची खर्चिक बाब वगळता अगदीच स्वस्त दरात राहण्याची सोय लॉजिंगच्या माध्यमातून त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये होत असते.
वर्षाऋतु मध्ये इथल्या नैसर्गिकरित्या साकारणार्या निसर्गाच्या चमत्काराची सप्टेंबर महिन्यात खर्या अर्थाने अनुभुती पहावयास मिळते. बारा महिन्यांतील पवित्र समजला जाणार्या श्रावण महिन्यात इथे निसर्ग निर्मितीचा अलौकिक आंनद आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी आणि श्रावण तापीच्या कोवळ्या उन्हात पॉईंट्सची सैर करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. सप्टेंबर महिन्यात डोंगर रांगात सभोवताली आणि पॉईंट्स परिसरात सोनकीची पिवळी फुले आच्छादलेली असतात.
चोहोबाजूंनी गर्द झाडी आणि त्यातून पायी चालत जाण्याची मजा सुध्दा काही औरच असते. पावसाळी हवामानात गर्द धुक्यातून मार्गक्रमण करताना अगदी समोरचं दृश्यदेखील दृष्टीक्षेपात येत नाही. नैसर्गिक सौंदर्य धुक्यात हरवल्यामुळे ही सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील विहंगमय दृश्ये न्याहाळण्यासाठी पर्यटक विविध पॉईंट्स वर गर्दी करतात. पॉईंटवरील हे दाट धुक्याचे नैसर्गिक आवरण मनाला मोहीत करते. धुके विरळ झाल्यावर क्वचितच इंद्रधनूची कमान धुक्या आड दिसल्यावर मन प्रसन्न होते. शारलोट लेक वरील ओसंडून वाहणार्या पाण्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आतुर झालेले असतात. महत्त्वाचे जवळपास पंधरा पॉईंट्स असून इको पॉईंट, लुईझा पॉईंट, वन ट्री हिल, लिटिल चौक पॉईंट, सनसेट, रामबाग, हनिमून पॉईंट, मलंग पॉईंट असे काही महत्त्वाच्या स्थळांना भेटी दिल्यावर खरोखरच मनाला आलेली ग्लानी दूर होते निसर्गाच्या सानिध्यात वेळ कसा निघून जातो याचे भान रहात नाही. पावसात भिजल्यावर कुठल्या स्टॉलवर गरमागरम भजी चहाचा आस्वाद घेत तर कुठं निखार्यावर भाजलेला गरमागरम मका खाण्याचा मोह सुध्दा आवरता येत नाही. कुणी घोड्यावर तर आबालवृद्ध हातरिक्षाच्या सहाय्याने पॉईंट्सवरील नयनरम्य देखावे पाहण्यासाठी जात आहेत. एकंदरीत पूर्वीचे आणि आताचे वर्तमानातील माथेरान यात जमीन अस्मानाचा फरक प्रकर्षाने जाणवतो. तीन दशकांपूर्वी पावसाळ्यात इथले संपूर्ण व्यवहार बंद असायचे. हॉटेल्स आणि जुन्या बंगल्याना गवताच्या झडी लावून चार महिने या सर्व वास्तू बंदिस्त असायच्या परंतु इथे वर्षाऋतुमध्ये पर्यटकांची रेलचेल वाढू लागल्याने आता हे सुंदर स्थळ बाराही महिने पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज असते.