। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील माथेरान व्हॅली स्कूलच्या तीन खेळाडूंनी जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांची रायगड जिल्हा संघात निवड झाली आहे. आपल्या शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची जिल्हा संघात निवड झाल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला पटेल यांनी अभिनंदन केले आहे. त्याचवेळी क्रीडा शिक्षक स्वप्नील अडुरकर आणि करण बाबरे यांना देखील संस्थेने शुभेच्छा दिल्या आहेत.
नाशिक येथे राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी जिल्ह्याची चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत कर्जत तालुक्यातील माथेरान व्हॅली स्कूलमधील मुली उतरल्या होत्या. या स्पर्धेत दैंनदिन सराव करणार्या शाळा आणि आश्रमशाळांमधील खेळाडूंचा सहभाग होता. मात्र, मुलींच्या सरावासाठी माथेरान व्हॅली शाळेने दोन क्रीडा शिक्षकांची नियुक्ती केल्याने विद्यार्थी खेळाकडे अधिक वळले आहेत. त्यातून जिल्हा स्तरावरील टेनिस क्रिकेट स्पर्धेत माथेरान व्हॅली स्कूलच्या खेळाडूंनी मोठी कमाल केली आणि त्यातून जिल्हा संघात तीन खेळाडू निवडले गेले. माथेरान व्हॅली शाळेची आर्या माळी ही रायगड जिल्हा संघाचे नेतृत्व करणार असून जुई वासावे व आयेशा गोंड यांची निवड झाली आहे.