पिरभोय वंशजांकडून तीव्र नाराजी
माथेरान | वार्ताहर |
माथेरान रेल्वेच्या नॅरोगेज मिनिट्रेनला युनेस्को मध्ये स्थान मिळाल्याच्या निमित्ताने येथील रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत परिसरात रेल्वे उत्सव साजरा करण्यासाठी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.पण या कार्यक्रमात माथेरान रेल्वेचे जनक सर आदमजी पिरभोय यांचा विसर आयोजकांना पडल्याचे प्रकर्षाने दिसून आले.यावरुन पिरभोय यांच्या वंशजाकडूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
रेल्वेचा उत्सव हा खर्या अर्थाने मोठया उत्साहाने आणि आनंदात साजरा करणे अपेक्षित होते कारण या दोन्ही दिवस चालणार्या उत्सवासाठी मुख्य अतिथी रेल्वेचे अपर महा प्रबंधक बी.के.दादाभोय,विशेष अतिथी व्यवस्थापक शलभ गोयल,प्रधान मुख्य अभियंता ए.के.गुप्ता यांसह अन्य प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या सोबत नगरपरिषदेचे काही मोजकेच लोकप्रतिनिधी सुध्दा यावेळी आवर्जून हजर राहिले होते.परंतु हा कार्यक्रम आयोजित करताना कुठल्याही प्रकारचे नियोजन केले गेले नसल्यामुळे पर्यटकांचा भ्रमनिरास झाला.
वंशजाची तक्रार
मिनिट्रेनचे जनक सर आदमजी पिरभोय यांच्या नावाचा कुठेही साधा उल्लेख केला गेला नाही अथवा आम्ही त्यांचे वंशज असताना आम्हाला निमंत्रित करण्यात आले नाही आम्ही स्वतः वरिष्ठांना या निमंत्रणा बाबत कळविले होते परंतु एका अधिकार्याने फोन करून सांगितले म्हणून आम्ही सहकुटुंब उपस्थित राहिलो होतो तर याजागी बसण्याची सुध्दा व्यवस्था करण्यात आली नाही सर्वजण उन्हात छोट्याशा मंडपाखाली बसले होते तर कित्येक लोक लांबूनच हा कार्यक्रम पहात होते.त्यामुळे आम्ही सदर कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.असे परिवाराच्यावतीने सांगण्यात आले.
मिनिट्रेनचे जनक सर आदमजी पिरभोय यांचा आणि त्यांचे चिरंजीव अब्दुल हुसेन आदमजी पिरभोय यांचा कुठेही फोटो लावला नाही.त्याकाळी 1907 मध्ये ही ट्रेन आमच्या आजोबांनी चार वर्षात सुरू केली होती ती पूर्वपदावर आणण्यासाठी आताच्या या रेल्वेच्या निष्क्रिय, कामचुकार अधिकारी वर्गाला जमत नाही ही खरोखरच लाजिरवाणी बाब आहे.
हुसेन आदमजी पिरभोय
पिरभोय यांचे नातू