माथेरानमध्ये कोसळधारा; 24 तासात 293 मिलिमीटर पावसाची नोंद

| माथेरान | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील उंच शिखरावरील पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये यावर्षीच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे मागील 24 तासांत तब्बल 293 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस असूनही जनजीवन सामान्य होते.

जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कर्मी झाले असले तरी त्याची कसर ऑगस्टच्या तीन दिवसात भरून काढली आहे. ऑगस्टच्या 1 तारखेपासून जोरदार पाऊस पडत असून, प्रत्येक दिवशी पावसाचे प्रमाण वाढले आहे. मागील चार-पाच वर्षांत जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला होता आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. पण, यावर्षी ऑगस्टमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मागील तीन दिवसांत जवळजवळ 500 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. असे असले तरी कुठेही अनुचित प्रकार घडला नसून, दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते. शनिवार व रविवार विकेंडला पर्यटकांची गर्दी असूनही जोरदार पावसात माथेरानचे पर्यटन जोमात सुरू होते.

यावर्षीच्या सर्वाधिक पावसाची नोंद 4 ऑगस्टला करण्यात आली. दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी दुपारी झालेल्या अतिवृष्टीत कार पार्किंगमध्ये उतार असूनही पाणी तुंबले होते.पण, यात कोणतीही हानी झाली नाही. अतिवृष्टीत पर्यटक मिनिट्रेनची व घोड्यावरील रपेटची मजा घेत होते. मात्र, स्थानिक नागरिकांना विजेअभावी मनस्ताप सहन करावा लागला.वीज नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पिण्याचे पाणी मिळाले नसल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version