| कर्जत | प्रतिनिधी |
माथेरान या जागतिक पर्यटनस्थळी याही वर्षी जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, जुलैअखेरपर्यंत 3557 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती पर्जन्यमापक निरीक्षक अन्सार महापुळे यांनी दिली.
माथेरानला 4 जून रोजी 0.5 मिमीने पावसाला सुरुवात होऊन संपूर्ण जून महिन्यापर्यंत एकूण फक्त 647.90 मिमी पर्जन्यनोंद झाली होती. मागील वर्षी पावसाळ्यात 30 सप्टेंबरअखेर माथेरानचे पर्जन्यमान 5623.20 मिमी म्हणजेच 221.4 इंच होते. तेव्हा, गेल्या वर्षीच्या तुलनेत माथेरानला यावर्षी सप्टेंबर अखेरचे पर्जन्यमान हे सरासरीपेक्षा जास्त अथवा कमी होईल का? हे निसर्गाच्या वातावरणावर आहे. असे असले तरी यंदा जुलै महिन्यातच पावसाने मागील महिन्यातील कसर भरून काढली असून, अजूनही पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. या काळात ही मुबलक पर्जन्यवृष्टी माथेरानला होईल, अशी अपेक्षा आहे.
माथेरानला यावर्षी आतापर्यंत, तब्बल 14 वेळा 100 मिमीच्या वर अतिवृष्टी झालेली आहे. यामध्ये एकूण 4 वेळा 200 मिमीपेक्षा जास्त पर्जन्यनोंद 24 तासांत झालेली आहे. माथेरानला यावर्षीची आतापर्यंतची 24 तासांतील 233 मिमी अशी विक्रमी पर्जन्यनोंद दि.25 जुलै रोजी झाली असून, माथेरानच्या पावसाची वाटचाल अजूनही दमदार चालू आहे.
31 जुलैच्या नोंदीनुसार मोरबे धरण क्षेत्रात 2571.60 मिमी इतकी पर्जन्यनोंद झाली असून, मोरबे धरण हे 79.62 टक्के इतक्या जलसाठ्याच्या क्षमतेने भरलेले आहे. या धरणाच्या जलसाठ्याची पूर्ण क्षमतेची पाणीपातळी ही एकूण 88 मीटर (190.890 मिलीयन क्यूबिक मीटर्स) इतकी असून, 31 जुलैपर्यंत यातील पाणीपातळी एकूण 83.83 मीटर इतकी भरलेली आह. म्हणजेच या धरणाचा जलसाठा 151.992 मिलीयन क्यूबिक मिटर्स इतका आह. तेव्हा माथेरान ला पडणाऱ्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे मोरबे धरण हे ऑगस्ट महिन्यात नक्कीच पूर्ण क्षमतेने नक्कीच भरून ओसंडून वाहू लागेल, असे जाणकरांचे मत आहे.






