| कर्जत | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ माथेरानमध्ये दोन दिवसात तब्बल 692 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती माथेरान नगरपालिकेचे पर्जन्यमान निरीक्षक अन्सार महापुळे यांनी दिली. माथेरानमध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाल्याचे पर्जन्य मापक निरीक्षक अन्सार महापुळे यांनी सांगितले. तर बुधवार सकाळ पर्यंत हा पाऊस पडत होता तर सकाळी आठ नंतर पाऊस कमी झाल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत फक्त 19 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीत माथेरान शहरात काही ठिकाणी भिंत कोसळली तर काही दस्तुरी कार पार्किंगमध्ये झाडे गाड्यांवर पडली. नेरळ माथेरान घाटात दरड पडल्याने मोठे दगड रस्त्यावर आले असून, कुठलीही जीवितहानी किंवा वित्त हानी झाली नाही. जर का ही दरड शनिवार- रविवार सुट्टीच्या दिवशी पडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही दरड तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. कार पार्किंग मध्ये पडलेली झाडे वनविभाग कडून काढण्यात आली अशी माहीती वनविभागाचे राजकुमार आडे यांनी दिली.
माथेरान घाटात रस्त्यावर वाॅटर पाॅईप स्टेशन नजीक पडलेला मोठा खड्डा टॅक्सी चालक मालक युनियनच्या सदस्यांनी स्वखर्चाने भरून नागरिकांची गैरसोय दूर केली. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे यांना माथेरान घाटातील खड्यांची बांधकाम विभागाला माहिती दिली असता त्यांनी लवकरात लवकर खड्डे भरण्याचे आश्वासन दिले आहे. माथेरानमध्ये अतिवृष्टीवर अधीक्षक सुरेंद्रसिंग ठाकूर हे लक्ष ठेवून होते त्यांनी ह्यात महत्वाची भुमिका बजावली ते प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आपत्कालीन ग्रुप वर आलेले प्रत्येक मेसेज वाचून संबंधित खात्याला सूचना करत होते तर वेळोवेळी ग्रुपच्या माध्यमातून लोकांना सावधगिरीचा संदेश देत होते. नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सदानंद इंगळे देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.







