माथेरान झाले एकशे चौऱ्याहत्तर वर्षांचे

। माथेरान । वार्ताहर ।

थंड वार्‍याचे शहर, लाल मातीचा रांगडा सुगंध, हिरवा शालू पांघरलेली डोंगररांग, गर्द वनराई, घोड्यांच्या टापांचा आवाज या वर्णनावरून साहजिकच आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं असेल ते म्हणजे सह्याद्री घाटाच्या पर्वतरांगेत एका कुशीत वसलेले रायगड जिल्ह्यातील एक प्रदूषणमुक्त असे अद्वितीय पर्यटनस्थळ आपलं माथेरान. माथेरान या अक्षरांना अस्तित्वात येऊन आज 174 वर्ष पूर्ण झाली आहेत. माथेरानचे नाव सध्यातरी जगाच्या नकाशावर प्रकाशझोतात आहे.

(दि.21) मे हा माथेरानचा स्थापना दिवस. आकाशाला गवसणी घालणारे उंचच्या उंच डोंगर, तर डोंगरदर्‍यांना येथे व्यापून टाकणारं घनदाट जंगल, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे आणि उंचच्या उंच कड्यावरुन कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे,घाटवळणाचे नागमोडी रस्ते, दाट धुक्याची चादर, हिरव्याकंच वनश्रीत पानांची सळसळ, झाडांवर माकडांच्या झुंडी, निरव शांततेत पक्षांची किलबिल, घोड्यांच्या टापांचा लयबद्ध आवाज, गर्द झाडीत लूप्त होणार्‍या लालमातीच्या पायवाटा, मती गुंग करणार्‍या खोल दर्‍या, हवीहवीशी वाटणारी शुद्ध हवाहे सगळं काही सामावलंय थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये. अप्रतिम आणि सुंदर दृश्यांनी वेढलेले हे छोटेसे हिल स्टेशन पावसाळ्यात देखील पर्यटकांना आकर्षित करते. हे आपले माथेरान मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून 110 किमोमीटर अंतरावर वसलेलं आहे.

याचा शोध लागला कसा, तर ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर ह्युज मॅलेट हे त्याकाळी रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना चौक गावापासून त्यांना समोर दिसणारा गर्द वनराई असलेला डोंगर भावला होता. त्यामुळेच त्यांनी आपला मोर्चा या डोंगराच्या दिशेने वळविला. सध्याच्या वन ट्री हिल पॉईंट मार्गाने ते पायवाटेने वर आले होते. इथला रमणीय निसर्ग आणि शुद्ध हवा, गर्द झाडी, खळखणारे झरे, निरव शांतता यामुळे सर ह्युज मॅलेट यांनी आपला मुक्काम याठिकाणी काही दिवस केला होता. त्यानंतर त्यांनी इथे एक छोटीसी वास्तू उभारली. डोंगराळ भाग असल्याने फक्त घोडे वाहतूक करत असत, म्हणून त्यांनी आपल्या वास्तूचे नाव ‘द बाईक’ असे केले होते.

21 मे 1850 मध्ये सर ह्युज मॅलेट यांनी माथेरानचा शोध लावला होता. त्यानंतर हळूहळू ब्रिटिशांकडे कामे करणार्‍या पारसी लोकांना मोठमोठे भूखंड देऊन त्याजागेवर पारसी लोकांनी आपले बंगले उभारले. या जंगलात राहण्यासाठी पारसी लोकांचे बंगले सांभाळण्यासाठी रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातील लोकांना माळी कामगार म्हणून काम दिले होते. आत्ता सध्याच्या परिस्थितीत अनेक पारसी लोकांनी आपले बंगले विकून मुंबई अथवा परदेशात स्थायिक झालेले आहेत.

1905 मध्ये केवळ हिलस्टेशन असल्याने या गावाला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आला आहे. 1907 मध्ये सर आदमजी पिरभोय आणि अब्दुल हुसेन आदमजी पिरभोय या पितापुत्रांनी नेरळ-माथेरान अशी मिनिट्रेन सेवा स्वखर्चाने त्याकाळी (सोळा लाख रुपये खर्च करून) उपलब्ध करून दिल्यामुळे इथे पर्यटकांची संख्या वाढत गेली, ती आजमितीपर्यंत वाढतच आहे. जवळपास साठ हॉटेल्स पाचशे पेक्षाही अधिक लॉजिंग त्याचप्रमाणे शासकीय निवासस्थाने पर्यटकांना सेवा देत आहेत.इथल्या स्थानिक लोकांच्या तीन ते चार पिढ्या आजही कष्टदायक कामे करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत. सध्याच्या घडीला नगरपरिषदेच्या सभागृहात कुणीही सत्ताधारी गट नसल्याने या गावाचा 174 वा वाढदिवस पालिकेमार्फत साजरा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कसे जाल ?
मुंबई पुण्याहून ट्रेनने नेरळ रेल्वे स्थानकात उतरून टॅक्सीने माथेरानला जाता येते. नेरळवरून अनेक पर्यटक पायी देखील निसर्गाचा आनंद घेत माथेरान गाठतात.
काय फिराल ?
माथेरानमध्ये अनेक पॉईंट्स आहेत. इको पॉईंट, मंकी पॉईंट, हनिमून पॉईंट, सिलिया पॉईंट, सनसेट पॉईंट, मॅलेट पॉईंट,पॅनोरमा पॉईंट, खंडाळा पॉईंट,वन ट्री हिल, अलेक्सझंडेर पॉईंट,रामबाग पॉईंट असे अनेक पॉईंट फिरण्यासारखे आहेत.
Exit mobile version