गॅस दरवाढीने माथेरानकर हैराण

। माथेरान । वार्ताहर ।
स्वयंपाकमध्ये वापरणार्‍या गॅसच्या किमतींमध्ये दर महिन्याला होणार्‍या वाढीने माथेरांकरांचे बजेट कोलमडले असून येथे मालवाहतुकीची व्यवस्था नसल्याने एक सिलिंडर मागे येथील स्थानिकांना 150 रुपये जास्त मोजावे लागत आहेत. त्यामुळे येथील स्थानिकांना गॅस वाहतुकीसाठी वाहन वापरण्याची परवानगी मिळाल्यास त्याचा फायदा येथील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. माथेरान हे समुद्र सपाटीपासून जवळ-जवळ 2500 फूट उंचीवर असलेले एक छोटेसे पर्यटन स्थळ आहे. ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यानुसार येथे आज ही इंधनावर चालणार्‍या वाहनांना प्रवेशबंदी आहे. त्यामुळे येथे लागणार्‍या सर्वच जीवनावश्यक वस्तू ह्या घोड्यांच्या पाठीवर लादून वाहतूक केली जाते. इंधनाचे दर वाढताच येथील सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असतात व एकदा वाढलेले दर पुन्हा खाली येत नाहीत. त्यामुळे येथील स्थानिकांना वाहन नाही पण इंधन दर वाढीचे चटके नेहमीच सोसावे लागत असतात. मागील काही दिवसांमध्ये इंधन दर वाढीमुळे येथील किराणा, भाजी, चिकन, अंडी, दूध या सारख्या वस्तूंचे भाव वाढले आहेत व माथेरान हे पर्यटनस्थळ असल्याने ह्या सर्व वस्तू येथील व्यावसायिकांसाठी गरजेच्या वस्तू आहेत. त्यामुळेच निदान गॅस वाहतुकीसाठी तरी अटी शर्तींवर वाहन सुरू करण्याची परवानगी मिळावी की जेणेकरून स्थानिकांचे निदान 150 रूपये तरी वाचतील.

Exit mobile version