विजेच्या लपंडावामुळे माथेरानकर त्रस्त

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरान पर्यटनस्थळावर सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे स्थानिक त्रस्त झाले असून वीज वितरण कंपनीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी गावात सगळीकडे विजेच्या पोलांवरून वीज पुरवठा केला जात होता. परंतु, पावसाळ्यात वादळी वार्‍याने मोठमोठे जुने वृक्ष विजेच्या पोलांवर आणि तारांवर मुळासहित उन्मळून पडत असल्याने कित्येक दिवस वीज पुरवठा खंडित होत असे. त्यानंतर याठिकाणी विजेची भूमिगत लाईन टाकण्यात आली आहे. तरी देखील बत्ती गुल होण्याचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढलेले आहे.

यातच मंगळवारी (दि.2) सकाळी शास्त्री हॉलच्या मागील बाजूस वार्‍याने विजेचे पोल पूर्णतः वाकलेले असल्याने काही भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात आपत्कालीन प्रसंगी शासकीय अधिकारी माथेरानमध्ये रहात नाहीत. त्यांना राहण्यासाठी शासकीय खोल्या दिलेल्या आहेत परंतु त्याचा वापर ते करत नाहीत. सद्यस्थितीत माथेरानमध्ये कोणत्याही शासकीय अधिकारी वर्गाला फारशी कामे नसतात. तरीसुद्धा ही मंडळी इथे राहण्यास टाळाटाळ करत असुन त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

लाईट जाण्याच्या नेहमीच्या त्रासामुळे पर्यटनावर मोठा परिणाम झाला असून शालेय विद्यार्थ्यांना ने आण करणार्‍या ई-रिक्षांना चार्जिंग नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. एकूणच इथल्या महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे सर्वांनाच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

भास्करराव शिंदे,
उद्योजक,
माथेरान
Exit mobile version