देखाव्यांमधून माथेरानकरांचे बाप्पाला साकडे

ई- रिक्षा, फेन्युक्युलर रेल्वे, पर्यायी मार्गांचे देखावे सादर


| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये ई-रिक्षाचे भिजत घोंगडे राहिले आहे. तर गेले अनेक वर्षे माथेरानसाठी पर्यायी मार्ग असावा अशी माथेरानकरांची मागणी देखील विचारात घेतली गेलेली नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात माथेरानमध्ये देखाव्यांच्या माध्यमातून भक्तांनी माथेरानचे प्रश्न उपस्थित करत थेट श्रीगणेशाला साकडे घातले असल्याचे चित्र आहे. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची जगात ओळख आहे. माथेरान म्हणजे निसर्गाने भरभरून दिलेल, निसर्गाचा वरदहस्त लाभलेले छोटेसे पण पर्यावरणपूरक शहर. येथील निसर्गाची भुरळ पडलेल्या पर्यटकांची माथेरानला दरवर्षी भेट हि ठरलेली असते. मुंबई पुणे या दोन्ही महानगरांच्या मध्यावर माथेरान वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून 803 मीटर उंचावर असलेल्या माथेरानला येथील घनदाट जंगल व सह्याद्रीच्या माथ्यावर वसल्याने माथेरान अशी बिरुदावली लाभलेली आहे. विकेंड म्हटला कि पर्यटकांची पाऊले आपोआपच कर्जत तालुक्याकडे वळतात. त्यातच माथेरान या जागतिक पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दाखल होत असतात. येथील लाल माती, प्रदूषणमुक्त वातावरण, घोड्यांची रपेट, पॉइंटवर ऊन सावलीचा खेळ, तर कधी धुक्याचा अंगाला अलगद झोम्बणारा वारा, असा आनंद पर्यटन घेत असतात.

पर्यावरण समृद्ध माथेरानमध्ये वाहनांना बंदी आहे. त्यामुळे माथेरानची प्रदूषणमुक्त शहर अशी ओळख आहे. असे असताना काळानुरूप बदल होणे आणि ते स्वीकारणे गरजेचे असतात. त्यामुळेच वाहनांना बंदी असल्याने त्याचा त्रास हा विद्यार्थ्यांना, जेष्ठ नागरिकांना यांना होत असतो. दुसरीकडे माथेरानमध्ये हातगाडीने देखील प्रवासी वाहतूक केली जाते. एका माणसाने दुसऱ्या माणसाला ओढणे हि ब्रिटिशकाळापासून अमानुष प्रथा असलेली बंद करण्यासाठी व ई-रिक्षा सुरु करण्यासाठी माथेरानकर नागरिकांनी व संस्थांनी सर्वोच्य न्यायालयात लढाई लढली. त्यामुळे न्यायालयाने या ई रिक्षांना प्रायोगिक तत्वावर चालवण्याची परवानगी दिली होती. हा प्रयोग यशस्वी देखील झाला. या रिक्षांचा वापर विद्यार्थ्यांपासून ते जेष्ठ नागरिक सर्वांना फायदेशीर ठरला असे असताना 90 दिवसांनंतर हा प्रयोग यशस्वी ठरल्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याबाबत अहवाल सादर करण्यात आला.

न्यायालयाने या नंतर परवानगी दिलेली असताना ई रिक्षाचे घोगडें अजून भिजत पडले आहे. तर दुसरीकडे माथेरानसाठी नेरळ माथेरान हा एकमेव रस्ते मार्ग आहे. या घाटात सध्या दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. तर मोठी दरड कोसळल्यास हा रस्ता पूर्णपणे बंद होऊन माथेरानचा संपर्क बंद होईल. त्यामुळे माथेरानला पर्यायी मार्ग व्हावा अशी मागणी गेले अनेक वर्षे माथेरानकर नागरिक करीत आहेत. मात्र हि मागणी देखील अजून विचारात घेतली गेलेली नाही. तर फिनॅक्युलर रेल्वे, रोप वे असे अनेक प्रकल्प धूळखात पडले आहेत. माथेरानचे पर्यटन वाढण्यासाठी माथेरानमधील प्रश्न निकाली निघायला हवेत. त्यामुळे थेट या प्रश्नांवरच माथेरानकर नागरिकांनी गणेशोत्सवात श्रीगणेशाची आरास करत देखावे सादर केले आहेत. एकंदर हे देखावे सादर करत या भक्तांनी श्रीगणेशाला या प्रश्नांबाबत साकडे घातले आहे.

Exit mobile version