माथेरानकरांना हवाय पर्यायी मार्ग

तातडीने उपाययोजना करावी, शासनाला आर्त साद

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानला येण्यासाठी आजही नेरळ या एकमेव मार्गावर अवलंबून राहावे लागत असल्याने अनेकदा याच मार्गाचा अवलंब करून परिसरातील लोक त्यांच्या हक्काच्या रास्त मागणीसाठी नेरळ माथेरान या घाटमार्गावर रास्ता रोको करत असतात. याचा परिणाम इथल्या पर्यटनावर होत असतो. माथेरानला येण्यासाठी अन्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध होऊ शकते त्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिक करत आहेत.

कर्जत-भूतीवलीमार्गे माथेरानला येण्यासाठी रोपवे सारखा महत्वकांक्षी प्रकल्प प्रलंबित आहे. त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी माथेरान भेटी दरम्यान, रोपवे प्रकल्प सुरू होईल असे नागरिकांना आश्‍वासीत केले होते. परंतु, पर्यावरण वाद्यांच्या काही जाचक अटींमुळे हा प्रकल्प लांबणीवर गेला आहे. पनवेल-धोदाणीमार्गे माथेरान असा एमएमआरडीएच्या माध्यमातून मार्गी लागणार्‍या फिनिक्युलर रेल्वेच्या व्यवस्थेससुध्दा मतांच्या राजकारणापायी तालुक्यातील आमदारांनी त्यावेळेस विरोध दर्शविला होता. त्यामुळे हा प्रकल्पसुध्दा लाल फितीत अडकून पडला आहे.

तिसरा पर्यायीमार्ग म्हणजे कर्जत चौक येथून रामबाग पॉईंटमार्गे माथेरान हा रस्तासुध्दा अगदी जवळचा असून याच मार्गाने त्याकाळी माथेरानचा शोध लावणारे ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर ह्युज मॅलेट यांनी 1850 मध्ये दगडी पायवाट केली होती. ती आजही शाबूत आहे, हा पर्यायीमार्ग सुध्दा माथेरानशी जोडला जाऊ शकतो.पाहीजे

26 जुलैच्या अतिवृष्टीमुळे माथेरानच्या घाटरस्त्यात मोठया प्रमाणावर दरडी कोसळून हा मार्ग बंद झाला होता. मिनिट्रेनचा मार्गसुध्दा वाहून गेल्याने दोन वर्षे ट्रेनची सेवा बंद करण्यात आली होती. त्यावेळी स्थानिकांचा जगाशी संपर्क तुटला होता. नेरळ ते माथेरान या एकाच मार्गामुळे स्थानिकांना नेहमीच वेठीस धरले जाते. त्यासाठी आमच्या हक्काचा पर्यायीमार्ग शासनाने आम्हाला देऊन इथे पर्यटन क्रांती घडवून आणावी अशी आर्त साद सर्वत्र ऐकू येत आहे.

पर्यायी मार्गाचे फायदे
मुंबईच्या पर्यटकांना माथेरान प्रवास अत्यंत जवळ आणि सोयीस्कर ठरू शकतो. पर्यटनात वाढ होऊन स्थानिकांसह परिसरातील लोकांच्या व्यवसायात भर पडेल. आजही परिसरातील जवळपास पंचवीस हजार लोक माथेरानवर आपली उपजीविका भागवत आहेत.



सन 2014 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्र राज्यात भाजप व शिवसेनेचे राज्य होते. तेव्हा पनवेलच्या आमदारांना मी स्वतः जून 2017 रोजी पनवेल माथेरान रस्ता व्हावा यासाठी दोन वेळा निवेदन दिले होते. परंतु, केवळ मताच्या राजकारणासाठी याबाबत काहीही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

जनार्दन पारटे,
अध्यक्ष पनवेल-माथेरान
रस्ता संघर्ष समिती माथेरान
Exit mobile version