पर्यटनमंत्र्यांकडून माथेरानकरांचा भ्रमनिरास

। नेरळ । वार्ताहर ।
माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेमधील विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे माथेरान येथे आले होते. यावेळी माथेरानमधील जनतेला येथील रोजगार निर्माण करणार्‍या प्रकल्पांची घोषणा पर्यटनमंत्री करतील अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली असून, आदित्य ठाकरे यांच्याकडून माथेरानकरांचा भ्रमनिरास झाला, असा आरोप माथेरानमधील विरोधी पक्ष करीत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून माथेरान मध्ये सुरु असलेल्या विकासकामांची उद्घाटने आणि भूमीपूजन यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी राज्याचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे माथेरान दौर्‍यावर आले होते. माथेरानमधील जनतेला येथील रोजगार निर्माण करणार्‍या प्रकल्पांची घोषणा पर्यटनमंत्री करतील अशी अपेक्षा होती. त्यात बंद असलेली नेरळ- माथेरान – नेरळ मिनीट्रेन सेवा, 60 कुटुंबांचा रोजगार अवलंबून असलेल्या व्हॅली क्रॉसिंग, पर्यायी वाहतूक मार्ग मागत असलेल्या माथेरानकरांना आदित्य ठाकरे फिनिक्युलर रेल्वे तसेच रोपवे प्रकल्प आणि ई रिक्षा बाबत जाहीर घोषणा करतील असे वाटले होते. मात्र, असे काहीही झाले नाही, त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक शिवाजी शिंदे आणि काँग्रेस कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी माथेरानकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न नगराध्यक्ष यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले नाहीत आणि आदित्य ठाकरे यांनीदेखील कोणतीही मोठी घोषणा केली नाही नसल्याने माथेरानच्या जनतेचा भ्रमनिरास झाला, अशी नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version