। माथेरान । प्रतिनिधी ।
माथेरानचे पावसाळी पर्यटन जोरात असून पावसाने दिलेल्या जोरदार सलामीने घाटातील धबधबे सक्रिय झाले असताना आता माथेरानचा शारलोट तलाव भरून वाहू लागल्याने येथील सुरक्षित धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहवयास मिळत आहे.
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र पावसाळ्यात डोंगरदर्यातून तयार होणारे फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांना भुरळ घालत असतात. सध्या पावसाने चांगलाच जोर धरला असून माथेरानमध्ये आत्तापर्यंत 760 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता पावसाळी पर्यटन हंगामदेखील जोरदार सुरू झाला आहे. डोंगरदार्यांमध्ये ओसंडून वाहणारे धबधबे, इथला हिरवागार निसर्ग आणि पावसाळी धुक्यातून रस्त्याने वाट शोधत जाताना पर्यटकांच्या होणार्या मज्जा मस्तीचा वेगळाच आनंद येथे असतो. माथेरान पावसाळी पर्यटन हंगामात पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील ओसंडून वाहणारा शारलोट तलाव धबधबा, माथेरान पर्यटनस्थळी प्रवेश करणारा प्रत्येक पर्यटक येथील शारलोट तलाव धबधब्याला भेट दिल्याशिवाय जाऊच शकत नाही. त्यातच हा तलाव मंगळवारी (दि.2) ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांना एक पर्वणीच मिळाली असून या धबधब्यावर भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.