| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान हे मुंबई-पुण्यापासून अगदी जवळचे ठिकाण असून, कुटुंबियांसह निवास करण्यास स्वस्त असल्यामुळे याठिकाणी विशेषतः पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वर्षासहलीसाठी पर्यटकांची गर्दी असते. त्यातच एकदिवसीय पर्यटकांची संख्या 90 टक्के असून, निवासी पर्यटक सुद्धा नियमितपणे येत आहेत. परंतु, या ठिकणी खासगी वाहनाने येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यांना नेरळ-माथेरान या घाट रस्त्यात तासंतास अडकून राहावे लागत आहे. त्यातच दस्तुरी नाक्यावर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम येथील व्यवसायांवर आणि विकासावर होत आहे. पर्यावरण मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळेच माथेरानचा विकास मेटाकुटीला आल्याचे बोलले जात आहे.
माथेरानमध्ये दरवर्षी सुट्ट्यांच्या हंगामात उन्हाळ्यात आणि खासकरून पावसाळ्यात एकदिवसीय पर्यटकांची मोठी गर्दी असते. परंतु, त्यांना येथील वाहतूक कोंडीमुळे माथेरान नकोसे वाटू लागले आहे. 15 ऑगस्ट रोजी तर नेरळपासून पायी चालत येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय होती. माथेरानमध्ये पंधरा हजार पर्यटक जरी आले तरी माथेरान हाऊसफुल्ल होऊन जाते. यावेळी तर जवळपास पन्नास हजार पेक्षाही अधिक पर्यटक दाखल झाले होते. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या नाकर्तेपणामुळे याठिकाणी अद्यापही पर्यायी व्यवस्था उपलब्ध होऊ शकलेली नाही ही खेदाची बाब असून, पर्यटन मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे इथला विकास खुंटला आहे. राज्यातील मंत्र्यांना माथेरान हे पर्यटनस्थळ माहीत आहे की नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने माथेरानकरांमधून उपस्थित केला जात आहे.
दुर्लक्षामुळे माथेरानचा विकास मेटाकुटीला
