माथेरानचा दिवाळी हंगाम बहरला

तीन दिवसात 17 हजार पर्यटक; घाटात मात्र वाहतूक कोंडी

| कर्जत | प्रतिनिधी |

माथेरानमध्ये पर्यटक हंगाम बहरला असून तीन दिवसात सुमारे सतरा हजार पर्यटकांनी येथे हजेरी लावली. खाजगी गाड्या घेऊन पर्यटक आल्याने घाटात वाहतूकची कोंडी झाली आहे. त्यामुळे माथेरानला पोहचण्यासाठी दोन तास लागत होते. शिवाय पार्किंग फूल्ल झाल्याने काही पर्यटकांनी आपल्या गाड्या नेरळ येथे पार्किंग करून टॅक्सीने माथेरान गाठले.

घाटातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलीस कमी पडत असल्याने नगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरून ट्रॅफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते. काही ठिकाणी टॅक्सी चालक देखील ट्रॅफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. हंगामामध्ये ट्रॅफिक नेहमीची डोकेदुखी ठरत असून याबाबत नियोजनाची गरज आहे, गाङी पार्किंग करता जागा नसल्याने बरेचसे पर्यटक माथेरानला न येता अन्य ठिकाणी गेल्याचे बोलले जात आहे.

पार्किंगची जागा अपुरी
स्वच्छता कर म्हणून नगरपालिका पैसै घेते तर गाङी पार्किंगचे पैसे वनविभागाकङून घेतले जातात. पण योग्य नियोजना अभावी पार्किंग कमी पडते तर काही जागा वनविभागाची आहे. मात्र त्या जागेचा उपयोग पार्किंग करिता होत नाही. त्यामुळे समस्या आणखीनच बिकट होत चालली आहे.

मिनीट्रेनही सुसाट
मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांमुळे मिनी ट्रेनचे तिकीट उपलब्ध झाले नाही. त्यामुळे काही पर्यटक घोड्यावरून तर काहीनी चालत माथेरान गाठले, नेहमी प्रमाणे गर्दीचा फायदा उठवत घोडे चालक जास्त दर आकारत होते. कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्या नंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरान मध्ये दाखल झाल्याने व्यावसायिक मात्र सुखावले आहेत, लवकरच ई रिक्षा चालू झाल्यास पर्यटक वाढीस मदत होणार असून जेष्ठांची सोय होणार आहे.

सुट्टयांच्या हंगामात दस्तुरी नाक्यावर नगरपरिषदेच्या माध्यमातून आम्ही तीन कामगार नेमलेले आहेत. पार्किंगसाठी ही जागा अपुरी पडते. या ठिकाणी असणारा एमपी 93 हा प्लॉट नगरपरिषदेकडे वर्ग झाल्यास पुढील काळात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होणार नाही.

सुरेखा भणगे ( शिंदे ) प्रशासक

पर्यटन हंगामापूर्वी नगरपालिका, पोलीस प्रशासन, वनविभाग , टॅक्सी चालक मालक संघटना यांची नियोजन करिता बैठक होणे आवश्यक आहे. त्या अभावामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. पावसाळा आला कि नेहमी अशीच अवस्था होते.

योगेश जाधव
अध्यक्ष संयुक्त वनव्यवस्थापन समिती माथेरान
Exit mobile version