माथेरानच्या ई-रिक्षांचा खडतर प्रवास

| माथेरान | वार्ताहर |

ई-रिक्षा सुरू झाल्यापासून समर्थक आणि विरोधक हे सर्वजण या सेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेताना दिसत आहे. मुख्यत्वे याठिकाणी ही स्वस्त, सुरक्षित आणि दस्तुरीपासून रेल्वे स्टेशनपर्यंत अल्प वेळेत पोहोचणारी सुविधा उपलब्ध झाल्याने इथे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. परंतु, ह्या पर्यावरणपूरक ई-रिक्षांना खड्डेमय रस्त्यातून तसेच अत्यंत खराब झालेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना अनेकदा पाटे तुटणे, पंक्चर होणे तसेच अन्य किरकोळ दुरुस्तीची कामे येत असल्याने रिक्षामालकांना खूपच खर्चिक बाब होत आहे. यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून लवकरच रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वाचनालयापासून ते पांडे रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड इथपर्यंत रस्त्यावरील दगडगोटे पूर्णपणे वर आल्याने शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करताना एकप्रकारे तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर, दस्तुरी येथील (काळोखी) चढणीवर अर्धा रस्ता घोडेवाल्यांच्या आग्रहास्तव जांभ्या दगडात घोड्यांना चालण्यासाठी रस्ता केला असून, अर्धा रस्ता क्ले पेव्हर ब्लॉकमध्ये बनविण्यात आला आहे; परंतु अनेकदा घोडे ब्लॉकच्या रस्त्यावरून रहदारी करत असतात, त्यामुळे रिक्षांना जांभ्या दगडाच्या रस्त्यावरून खडतर प्रवास करावा लागत आहे. सध्या जरी हा ई-रिक्षाचा सहा महिन्यांचा पायलट प्रोजेक्ट असला, तरी जोपर्यंत न्यायालयाचे नव्याने आदेश प्राप्त होत नाही, तोपर्यंत ई-रिक्षाची सेवा कायमस्वरूपी राहणार आहे, असे संघटनेच्या कार्यकारिणीकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version