माथेरानच्या मिनीबसला ग्रहण

वारंवार बिघाडामुळे प्रवांशाचे हाल

| कर्जत | प्रतिनिधी |

अल्प दरात विद्यार्थी तसेच माथेरानच्या नागरिकांना सेवा मिळावी याकरिता नेरळ-माथेरान घाटात कर्जत-माथेरान अशी मिनीबस बससेवा 11 ऑक्टोबर 2008 रोजी सुरू करण्यात आली. सुरूवातीच्या काळात सुरळीत चाललेल्या बसला आता ग्रहण लागले असून, बस सातत्याने घाटात बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

2012 साली नवीन बस नेरळ माथेरानकरिता खरेदी करण्यात आल्या; परंतु माथेरानचा घाटात अति तीव्र चढाव असल्याने तसेच योग्य देखभालीअभावी या जीर्ण झालेल्या बसेस गरम होऊन घाटात वारंवार बंद पडत आहेत. याचा नाहक त्रास ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांग तसेच विद्यार्थीवर्गाला बसत आहे. जेथे घाटात बस बंद पडते, तेथून लहान मुलांना घेऊन प्रवाशांना चालत माथेरान गाठावे लागते. सध्या नेरळ माथेरान घाटात चालू असलेल्या मिनीबस जुन्या झाल्या असून, तात्काळ नवीन बस खरेदी कराव्यात अन्यथा एखादा मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते व नेहमी बसने प्रवास करणारे नितीन सावंत यांनी विचारला आहे.

काही दिवसांपूर्वी एक नवीन मिनीबस माथेरानच्या घाटात चाचणीकरिता आणली होती. परंतु, ती मोठी असल्याने घाटात वळणावर मागे-पुढे करावी लागत असल्याने तिही बस चालू शकली नाही. माथेरानला दोन मिनीबस लवकर मिळणार अशी घोषणा आ. महेंद्र थोरवे केली, पण अजूनही नवीन बस माथेरानला आल्या नाहीत. माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंतदेखील नवीन बस मिळाव्यात याकरिता वेळोवेळी पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत आहेत; पण त्यांनाही यश आलेले दिसत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच शासनाला जाग येईल का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version