जून महिन्यात दीड लाख पर्यटकांनी केली मौजमजा
| माथेरान | वार्ताहर |
जून महिन्यात रेकॉर्डब्रेक पर्यटक आल्यामुळे माथेरान हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असल्याचे अधोरेखित झाले आहे. जून महिन्यात पर्यटकांची मांदियाळी पाहवयास मिळाली. या एक महिन्यात तब्बल एक लाख तीस हजार आठशे सेहेचाळीस पर्यटकांनी माथेरानच्या पावसाची मौजमजा घेतली. माथेरानला जून महिन्यात 686.1 मिलिमीटर पाऊस झाला असून, दाट धुक्यातून वाट काढत अंगावर पावसाचे थेंब घेत गरम भजी, चहा आणि मका याचा आनंद घेत पर्यटनाची रंजक मजा घेताना पर्यटक पाहवयास मिळाले. जुलै महिन्यातसुद्धा हीच परिस्थिती दिसत असल्याने माथेरानकर समाधान व्यक्त करत आहेत.
माथेरान हे तिन्ही ऋतूत आपली वेगळी छाप सोडत असते. पावसाळ्यात तर माथेरान एक वेगळ्या जगाची अनुभूती देते. दाट धुके त्यातून वाट काढत संथ गतीने धावणारी झुकझुक मिनिट्रेन, उंच झाडांच्या पानातून अंगावर पडणारे टपोरे पावसाचे थेंब, हे अद्वितीय क्षण फक्त माथेरानच्या लाल मातीत अनुभवता येतात. या क्षणाची प्रत्यक्ष मजा घेण्यासाठी पर्यटकांची पावले माथेरानकडे वळू लागली आहेत. मुंबई आणि पूण्यापासून जवळचे पर्यटनस्थळ असल्याने पावसाळी पर्यटनातुन धमाल मस्ती करण्यासाठी पर्यटक जून महिन्यापासून माथेरानकडे आकर्षित होऊ लागली आहेत. उंच डोंगर माथ्यावर गर्द वनराईत येण्यासाठी आता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यामध्ये घोडा, ई-रिक्षा, तसेच मिनिट्रेनच्या रंजक सफरीचा समावेश आहे. काही हौशी पर्यटक भरपावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेत पायी चालत पर्यटन करतात. नगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 जून ते 30 जून या तीस दिवसात तब्बल 1 लाख 30 हजार 846 पर्यटकांनी माथेरानला भेट देऊन येथील पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. आता जुलै महिन्यात देखील अशीच परिस्थिती पाहवायस मिळत आहे.
शारलोट ओव्हरफ्लो
शारलोट तलाव तुडुंब भरल्यानंतर ओव्हर फ्लो पाणी हे बंधार्यावरून खाली कोसळते. त्याच्याखाली अनेक पर्यटक मौजमजा करताना दिसतात. मात्र पाऊस जोरदार असेल तर या पाणलोट क्षेत्रात पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून मज्जाव करण्यात येतो. यावर्षी 30 जून ला सकाळी हा शारलोट तलाव ओव्हरफ्लो झाला असून, पर्यटक धमाल मस्ती करताना दिसत आहेत. दरम्यान अजूनही दमदार असा पाऊस झाला नसला तरी सरींवर पाऊस बरसत असल्याने पर्यटक मनसोक्त येथे मजा घेत आहेत. याच्या बाजूला असलेल्या मक्याचे ठेले, चहा, भजीची दुकाने भरलेली पाहवायस मिळत आहेत.
पावसाळ्यातील मिनिट्रेनची रंजक सफर
पूर्वी पावसाळा आला की मिनिट्रेन चार महिन्यांसाठी बंद असायची. त्यामुळे पर्यटकांना मिनिट्रेनची पावसाळी मजा घेता येत नव्हती. पण आता मध्य रेल्वेने ही सेवा पावसाळ्यात उपलब्ध करून दिली आहे. 8 जूनपासून नेरळ-माथेरान मिनिट्रेन सेवा बंद करण्यात जरी आली असली तरी अमनलॉज-माथेरान ही शटल सेवा अविरत सुरू आहे. पर्यटक याकडे जास्त आकर्षित होताना दिसत आहेत. शनिवार व रविवार या मिनिट्रेनसाठी लांबच लांब रांग लागल्याचे चित्र पाहवायस मिळत आहे. सेकंड क्लास 55 रुपये आणि फर्स्ट क्लास 95 रुपये वाजवी तिकीट दर असल्याने पर्यटकांची पहिली पसंती मिनिट्रेनला मिळत आहे.
ई-रिक्षाने प्रवासाला गती
दस्तुरी ते माथेरान या दोन किलोमीटर अंतरासाठी पायपीट करावी लागत होती.काही पर्यटक हे जास्त पैसे खर्च करून घोडे किव्हा हातरीक्षाने माथेरानमध्ये येत होते यामध्ये पैसा आणि वेळ खर्च होत होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने या मार्गावर 20 ई-रिक्षा धावू लागल्या आहेत. ज्या पर्यटकांना चालण्याचा त्रास आहे, दिव्यांग आणि जेष्ठ नागरिक आवर्जून याचा उपभोग घेत आहेत. हलूहळू ई-रिक्षा देखील पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रति प्रवासी 35 रुपये दर असल्याने पर्यटक ई-रिक्षाकडे आकर्षित होताना दिसत आहे.
पावसाळी पर्यटनात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेलमध्ये वेगवेगळे मनोरंजन आहे. यामध्ये नैसर्गिक रेन डान्स, डीजे विथ गेम्स, मॅजिक शो, जगलर शो, रेंनी जंगल सफर असून, पर्यटक याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. जेवणामध्ये अनेक प्रकार ठेवले आहेत.त्यामुळे पर्यटक समाधानी होत आहेत.
अनिल गायकवाड,
व्यवस्थापक,
प्रीती हॉटेल
माथेरानचे निसर्गसौंदर्य विलक्षण सुख देणारे आहे. पावसाळ्यात एकदा तरी माथेरानमध्ये आले पाहिजे. शुक्रवारी आम्ही आलो, आता असं वाटत की इथेच वास्तव्य करावं. येथे घालवलेले क्षण आम्हाला पुन्हा येण्यास परावृत्त करणार हे नक्की, कारण येथील क्षण आमच्यासाठी अद्वितीय असणार आहेत.
श्रीनिवास तांडेल,
पर्यटक मुंबई