अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान,
पर्यटकांचे झाले हाल
नेरळ | वार्ताहर |
सतत पाच दिवस पडत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे माथेरानचे जनजीवन पूर्णतः ठप्प झाले असून, जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. येथे आलेल्या पर्यटकांना अनेक हाल अपेष्ठा सहन कराव्या लागल्या. जोरदार कोसळणार्या पावसामुळे रात्रीच्या वेळेस घरात पाणी शिरल्याची घटना घडली असून, एक महिला यात दुखापतग्रस्त झाली आहे. आता माथेरान पूर्वपदावर येत असून, पावसाचा जोर कायम असल्याने पर्यटकांचे मोठे हाल होत आहेत.
26 जुलै 2005 नंतर यावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आहे. या पावसात पर्यटकांचे हाल झाले. लोक निद्रावस्थेत असताना मुस्लिम मोहल्यातील तीन घरात पाणी शिरले. माथेरानमध्ये उतार असल्याने स्वाभाविक पाण्याचा निचरा त्वरित होतो. मात्र, ही घरात पाणी शिरण्याची ही पहिलीच वेळ आहे. येथील एका सेनेटोरियमवर महाकाय झाड कोसळले. मात्र, जीवितहानी झाली नाही. आतापर्यंत 2940 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस माथेरानमध्ये झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापन फक्त कागदावरच
सतत कोसळत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे लोक एकमेकांना धीर देताना दिसत होते. मात्र, आपत्ती व्यवस्थापन कुठेही कार्यरत असताना दिसले नाही. मुस्लिम मोहल्यातील लोकांनी सांगितले की पाण्याचा लोंढा आमच्या घरामध्ये आला. शेजार्यांनी मदत केली, पण आपत्ती व्यवस्थापनाचे कोणीही मदतीला आले नाही. शेवटी शेजारी आणि लहान मुलांच्या मदतीने पहाटे साडे पाचपर्यंत पाणी काढत होतो. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कागदावरच आहे का, असा सवाल या नागरिकांमधून केला जातोय.
रुग्णवाहिका नादुरुस्त
घरात शिरलेल्या पाण्याचा उपसा करत असताना महिलेला दुखापत झाली. नगरपरिषदेच्या रुग्णवाहिकेसाठी फोन लावला असता महाराष्ट्र शासनाची 108 आणि नगरपरिषदेची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. नेरळहून तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना हॉस्पिटलला नेले, असे रिजवना शेख यांनी सांगितले.