मिनीट्रेन आली रुळावर; पर्यटक प्रवाशांचा मोठा प्रतिसाद
| नेरळ | प्रतिनिधी |
ब्रिटिश काळात सुरू झालेली नेरळ-माथेरान-नेरळ ही नॅरोगेजवर चालविली जाणारी मिनीट्रेन बुधवार, दि. 6 नोव्हेंबरपासून पर्यटकांच्या सेवेत आली. मिनीट्रेन नेरळ-माथेरान-नेरळदरम्यान दोन फेर्या मारणार आहे. तब्बल 20 दिवस उशिरा पर्यटक प्रवाशांचे सेवेत येत आहे. नेरळ येथून मिनीट्रेनचा पर्यटन हंगाम सुरू होत असल्याने नेरळ येथील रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून गाडीची पूजाअर्चा करण्यात आली.
नेरळ जंक्शन स्थानकातून नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेनचा पर्यटन हंगाम सुरू झाला. पावसाळ्यात चार महिने सुट्टीवर असलेली मिनीट्रेन 15 ऑक्टोबर रोजी सुरू होते. यावर्षी नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन मार्गावर दुरुस्तीचे कामे सुरू असल्याने नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे यावर्षी मिनीट्रेनचा नवीन हंगाम सुरू झाला नव्हता. यावर्षी दिवाळी सण उशिरा असल्याने मिनीट्रेन उशिरा सुरू होत असल्याने पर्यटकदेखील मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू होण्याची वाट पाहात होते. बुधवारी सहा नोव्हेंबर रोजी मिनीट्रेनची वाहतूक सुरू झाली. त्याआधी नेरळ जंक्शन स्थानकात मिनीट्रेनच्या इंजिनाची पूजा करण्यात आली. या नॅरोगेज मार्गावर काम करणारे सर्व कर्मचारी यांच्याकडून पूजा करण्यात आल्यानंतर मिनीट्रेनला नेरळ स्थानक प्रबंधक जी.वाय. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून नवीन हंगाम सुरू झाला. त्यावेळी नेरळ लोको कार्यशाळेमधील अभियंते संजीवकुमार यादव, शुभम गुप्ता, एस.के. गुप्ता, अनिल कुमार, के.जी. विनोद, पीडब्ब्ल्यूआय शरद सानप, तर तिकीट बुकिंग म्हणून प्रेमचंद आणि बिर्जून कुमार यांनी काम पाहिले. शुभारंभ कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी उपस्थित होते.
मिनीट्रेन नवीन हंगामाचे सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी सुटलेल्या पहिली ट्रेनचे सारथ्य मोटरमन ठाणगे आणि सहायक मोटारमन हाबले यांनी केले. तर गार्ड म्हणून सचिन पाटील यांनी, तर तिकीट तपासनीस म्हणून एस.जी. भगत यांनी कामकाज पाहिले. या पहिल्या मिनीट्रेनसाठी लावण्यात आलेले सर्व चारही प्रवासी डब्बे प्रवाशांनी फुल्ल झाले होते.त्यात प्रथम श्रेणी डब्यातून 16 आणि द्वितीय श्रेणी डब्यातून 90 पर्यटक प्रवासी केला. तर, सलोन या डब्यातून पाच प्रवाशांनी 1650 रुपये खर्चून तिकीट मिळवले होते. सकाळी दहा वाजून 25 मिनिटांनी सुटलेल्या दुसर्या ट्रेनमधूनदेखील प्रवासी पर्यटकांची गर्दी होती आणि ती गाडीदेखील हाऊसफुल्ल चालली.
भाग्यवान प्रवासी पुण्यातील
जाकीर तांबोळी हे पुणे येथील पर्यटक नेरळ येथे पर्यटनासाठी आले होते. त्यांना मिनीट्रेन सुरु होणार याची माहिती होताच माथेरान जाण्याचा प्लॅन त्यांनी केला. त्यानंतर पहाटे साडेचार वाजता जाकीर यांचे मातोश्री या पहाटे साडेचार वाजता नेरळ स्थानकात येऊन बसल्या होत्या. सकाळी आठ वाजता तिकीट खिडकी उघडल्यानंतर जाकीर तांबोळी यांनी आपल्या कुटुंबासाठी मिनीट्रेन प्रवासाची तिकिटे मिळविली. या कुटुंबाने मिनीट्रेनमधील सलोन डब्याची तिकिटे मिळविली. त्या प्रवासी डब्यातून केवळ पाच प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे तांबोळी यांनी आमचे कुटुंब मिनीट्रेन प्रवास एन्जॉय केला.
गाडीला एसी डब्बा नाहीच
नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर दररोज सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी सोडल्या जाणार्या मिनीट्रेनसाठी 16 प्रवासी यांच्यासाठी असलेला वातानुकूलित प्रवासी डब्बा लावला जातो. मात्र, या पहिल्या गाडीसाठी वातानुकूलित डब्बा लावण्यात आला नव्हता.
गाडीचे वेळापत्रक
नेरळ ते माथेरान
सकाळी 08.50, 10.25
माथेरान ते नेरळ
दुपारी 02.45,.4.00