माथेरानचा वडापाव आणि जॅकीचे ऋणानुबंध

दुसऱ्या पिढीशीही जपलेय नाते


| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या पर्यटन स्थळाच्या प्रेमात कोण पडणार नाही? असा निसर्ग माथेरानला मिळाला आहे. वर्षातील तिन्ही ऋतूमध्ये येथील निसर्ग वेगवेगळी रूपे परिधान करुन अनेकांना आपल्या प्रेमात पाडतो. हाच निसर्ग आणि माथेरानमधील कदम टी स्टॉलमधील बटाटा वडा प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या आवडीचा बनला आहे. दरम्यान, कदम यांचा बटाटावडा आणि जॅकी श्रॉफ यांचे ऋणानुबंध गेली 40 वर्षे कायम असून, आता कदम टी स्टॉलच्या दुसऱ्या पिढीसोबतही जॅकी स्नेह जपत आहेत.

माथेरान येथे पर्यटनासाठी आलेले जॅकी श्रॉफ यांची लक्ष्मी हॉटेलचे मालक मुकेश मेहता यांची ओळख झाली. त्यानंतर मुकेश मेहता यांनी जॅकी श्रॉफ यांना घेऊन माथेरानचे आराध्य दैवत असलेल्या श्री पिसारनाथ महाराज यांच्या मंदिरात नेले. मंदिरात काही वेळानंतर जॅकी श्रॉफ हे 40 वर्षांपूर्वी मंदिराच्या समोर असलेल्या कदम टी स्टॉल या पत्र्याच्या भिंती असलेल्या चहाच्या दुकानात जाऊन बसले. मात्र, या टी स्टॉलचे मालक लक्ष्मण कदम यांनी पिक्चरमध्ये दिसणाऱ्या हिरोला पाहून बटाटा वडा खाण्याचा आग्रह केला. त्या दिवसापासून बटाटा वड्याच्या प्रेमात अभिनेते जॅकी श्रॉफ पडले आहेत. ते कधीही माथेरानमध्ये आले की, पिसारनाथाचे दर्शन घेण्यासाठी जायचे आणि त्यानंतर कदम यांना आवाज देऊन वडापाववर ताव मारायचे, अशा पद्धतीने सुरू झालेली परंपरा आजही कायम आहे.
आज लक्ष्मण कदम या जगात नसले तरी त्यांची मुलगी मेघा यांच्यासोबतदेखील लहानपणापासून ऋणानुबंध निर्माण झाल्याने जॅकी अगदी आपल्या कुटुंबातील व्यक्तीसारखे कदम टी स्टॉलमधील सर्वांची विचारपूस करीत असतात. जॅकी यांनी कदम टी स्टॉलसोबत 40 वर्षांपासून जपलेला ऋणानुबंध आजच्या धकाधकीच्या जीवनात कायम जपला असल्याचे दुर्मिळ उदाहरण यानिमित्ताने कदम कुटुंबियांनी अनुभवले. त्यावेळी जॅकी सोबत असलेल्या चार जणांनी तब्बल 14 वडे खाल्ले आणि आलं घातलेला चहा घेऊन तेथून निघाले. त्यामुळे कदम ती स्टॉलमधील बटाटा वडा हा त्यांच्या त्या दिवसाचा आहार होता, असे ऋणानुबंध जॅकी यांनी जपले असल्याचे त्यांचे मित्र जकी नजे सांगतात. त्यामुळे माथेरानमधील निसर्ग, माथेरान आराध्य दैवत आणि माथेरानचा बटाटावडा या तिघांचे महत्त्व अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या जीवनात महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Exit mobile version