पर्यटन हंगामावर परिणाम होण्याची शक्यता
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटन स्थळांवर राहणार्या नागरिकांना आणि येथे येणार्या पर्यटकांसाठी पाणी महत्त्वाची बाब आहे. नेरळ येथील उल्हास नदी येथून होणारा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे दुसरीकडे माथेरान शहराला मागील काही वर्षापासून शार्लोट लेकमध्ये असलेले पाणी उचलून त्याचे वितरण केले जात आहे. दरम्यान, माथेरानमधील पर्यटन हंगाम लक्षात घेता नेरळ येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहिल्यास पर्यटन हंगामावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.
नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागतासाठी माथेरानमध्ये हजारो पर्यटक येत असतात. मात्र, त्याआधी दहा दिवस माथेरानमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने शहरातील नागरिकांना त्रस्त केले आहे. शहरात अनेक भागात पिण्याचे पाणी वेळेवर पोहोचत नाही. दुसरीकडे माथेरान शहरात दररोज येणारे पर्यटक आणि शनिवार-रविवारी वीकेंड लक्षात घेऊन पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माथेरान हे 800 मीटर उंचीवर असलेले पर्यटन स्थळ असून, ब्रिटिशांनी तेथे राहणार्या लोकांसाठी शार्लोट लेक बांधले आणि तेथील पाणी शहरातील नागरिकांना दिले जाते. मात्र, माथेरानमधील जनता आणि येणारे पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी नेरळजवळील कुंभे येथून वाहणार्या उल्हास नदीवरून पाणी उचलून ते 20 किलोमीटर अंतरावर नेले. नेरळ येथील कुंभ येथे असलेल्या पंप हाऊसमधून दररोज 18-20 तास पाणी उचलून माथेरान येथे पाठवले जाते. त्याचा फायदा माथेरानमधील शार्लोट लेकमधील पाणीपुरवठा शहरासाठी राखीव ठेवण्यात येत असतो.
मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिपत्याखाली असलेल्या माथेरान नळपाणी योजनेसाठी उल्हास नदी येथून पाणी उचलून नेले जाते. गेली पाच दिवस नेरळ कुंभे येथील पंप बिघडल्याने माथेरान शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन बिघडले आहे. उल्हास नदीमधून उचलले जाणारे पाणी गेली पाच दिवस उचलणे बंद झाले असून, त्याचा थेट परिणाम माथेरानमधील जनजीवनावर झाला आहे. माथेरान शहरात मागील तीन दिवस अनेक भागात पिण्याचे पाणी पोहोचले नाही. त्यात आता माथेरानमध्ये मागील तीन दिवसांपासून शार्लोट लेकमधून पाणी उचलून शहरात वितरित करण्याचा प्रयत्न जीवन प्राधिकरण यांच्याकडून सुरू आहे. दोन दिवसांनी माथेरानमधील शनिवार-रविवार हा वीकेंड असून, माथेरान शहराला नेरळ येथून पाणीपुरवठा झाला नाही, तर मात्र तेथील पर्यटन धोक्यात येणार आहे.
सध्या शार्लोट लेकमधून पाणी उचलले जात आहे. मात्र, सतत सुरू असलेल्या पाणी उचलण्याच्या प्रक्रियेमुळे शार्लोट लेकमधील पाण्याची पातळी कमी होत आहे. दुसरीकडे तेथेदेखील सध्या एकच 50 एचपी क्षमतेचा पंप कार्यान्वित असून, तो पंप बिघडला तर मात्र शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. तर, माथेरानसाठी होणारा पाणीपुरवठा नेरळ येथून आणखी काही दिवस सुरू होण्याची शक्यता नाही. नेरळ कुंभ येथील विजेचा पंप बिघडला असून, तो दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ते पंप दुरुस्त होण्यास आणखी काही दिवस लागले तर मात्र माथेरानमधील जनतेच्या तोंडचे पाणी पळून जाणार आहे.
माथेरान पाणीपुरवठा नियोजन पूर्णपणे अनियमित होत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून नेरळ पंप बंद आहे. माथेरान येथे 50 एचपी क्षमतेचा एकच पंप चालू आहे. आम्ही शक्य होईल तेवढे पाणी ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. संपूर्ण माथेरानमध्ये एकाचवेळी पाणीपुरवठा करणे सध्या शक्य नाही. त्यामुळे नेरळ पंप सुरळीतपणे लवकर चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
माथेरानमध्ये येणारे नेरळ कुंभ येथील पाणी येणे बंद आहे. ही स्थिती दोन दिवसांत सुधारणे अत्यंत आवश्यक बाब आहे, नाहीतर येणारा वीकेंड धोक्यात येऊ शकतो.
– प्रसाद सावंत, हॉटेल व्यावसायिक







