पर्यटक खुश
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान पर्यटनस्थळी असलेल्या जंगलात चैत्र महिन्यापासून जंगली मेवा मिळायला सुरुवात होते. जंगलातील जंगली झाडांना फुले आणि फळे येण्याचा हंगाम सुरू होतो. जंगलातील फळे ही माथेरानकरांसाठी औषधी ठेवा असतो. त्यामुळे माथेरानमधील तरुण आणि स्थानिक आदिवासी हे या फळांचा आस्वाद घेण्यासाठी जंगलात फिरताना दिसत आहेत.
समुद्रसपाटीपासून 803.98 मीटर उंचीवर असणारे सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीतील निसर्गाचे देणे लाभलेले निसर्गरम्य माथेरान आणखी खुलून गेले आहे. माथेरानला येणारा पर्यटक आपल्या नजरेत साठवून घेऊन जात असतो. माथेरानच्या डोंगरदर्या आणि घनदाट जंगल हे माथेरानचे आकर्षण आहे. सध्या येथे उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. मात्र, चैत्र महिन्याची सुरुवात झाली आणि अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने माथेरानमधील झाडांवर बसलेला लाल मातीचा थर हा जमिनीवर खाली कोसळला आहे. अवकाळी पावसामुळे यावर्षी काही प्रमाणात अधिक जंगली मेवा बहरात आला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जंगल भाग असलेल्या माथेरानच्या निसर्गाला बहर आल्याचे दिसून येत आहे.
माथेरानमधील जंगलात आढळणारी जंगली झाडे यांना लागणारी फुले, फळे ही वेगळी अनुभूती देत असतात. जंगलात अटक आठुरणे, फणशी, आसाना, तोरणे, जांभूळ, करवंदे आदी जंगली फळे यांचा हंगाम सुरू झाला आहे. कमी प्रमाणात असला तरी यापैकी अनेक झाडांना लागलेली फुले ही फळामध्ये रुपांतरीत झालेली दिसून येत आहेत. त्यामुळे माथेरामधील हौशी तरुण आणि स्थानिक आदिवासी हे जंगल भागात फिरून फळांचा शोध घेवू लागले आहेत. त्या फळांमधील अटक, आसाणा हा जंगली मेवा माथेरान आणि महाबळेश्वर शिवाय अन्य कुठेही जंगलात मिळत नाही. त्यामुळे पर्यटकदेखील या फळांची खरेदी करण्याचा आवडीने प्रयत्न करीत असतो. त्यात हा जंगली मेवा मिळण्याची ठिकाणे माथेरान शहरात जागोजागी दिसून येत आहेत. गार्डन, कारंजा, स्टेशन परिसर शिवाय नरोगेज मार्गावर आणि विशेष संख्येने जंगली मेवा विकणारे हे प्रामुख्याने अमन लॉज स्थानकात पर्यटकांच्या सेवेत असतात.







