| पेण | प्रतिनिधी |
गेली तीन ते चार महिने जिल्ह्यात गुटखा आणि मटक्यावर पोलिसांची करडी नजर आहे. तरी देखील, वडखळसह नागोठणे आणि पोयनाड विभागात हे दोन्ही अवैध धंदे पोलिसांची नजर चुकवून केले जात आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे धंदे बसस्थानक व रिक्षा स्टँडच्या शेजारी तसेच जेथे वाहतूक व्यवस्थेची सुविधा आहेत, अशा ठिकाणी सुरु करण्यात आले आहेत. गुटखा माफिया बिनधास्तपणे हा धंदा करत असून, त्याच्यावर लगाम घालण्यात पोलीसांना अपयश येत आहे की अपयश आल्याचा कांगावा करीत आहेत, असा सवाल स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे. तसेच, मटक्याचे नंबर घेण्यासाठी चुप्या पद्धतीने मटका माफियांची माणसे कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हे पोलिसांना दिसत नाही, ही देखील बाब आश्चर्याची आहे. त्यामुळे या मटका आणि गुटखा माफियांना रायगड पोलीस वेसन घालतील का? अशी चर्चा आत्ता जोरधरु लागली आहे.







