। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागात शेतकर्यांच्या वहिवाटीच्या अडचणी लक्षात घेता मातोश्री पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 564 पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे हजारो किलोमीटरचे रस्ते होणार असले, तरी त्या रस्त्यांची कामे करण्यासाठी शेजारच्या शेतकर्याने किंवा जागा मालकाने रस्ता रुंदीकरणासाठी जमीन देणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत सकारत्मकता नसल्याने जिल्ह्यात ही योजना कागदी लढाईतच अडकण्याची शक्यता आहे.
शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावा, या दृष्टीकोनातून ’मी समृद्ध तर गाव समृद्ध’ या योजनेत पाणंद रस्त्यांची संकल्पना मनरेगातून राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेतरस्ते तयार करण्यासाठी मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना राबिवण्यात येत आहे. शेतापर्यंत रस्ता नेण्यासाठी मातोश्री शेत पाणंद रस्त्यामधून जिल्ह्यात 564 रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. कामे मंजूर करण्यात आलेली असली, तरी एकही काम झालेले नाही. रस्त्यासाठी कोणीही जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे जमीनीचे कागदी घोडेच या योजनेत आतापर्यंत नाचत आहेत. ही कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मातोश्री शेत पाणंद रस्त्याच्या माध्यमातून करण्यात येणार होती.
जिल्ह्यात पाणंद रस्त्याच्या मंजूर कामांपैकी न होणार्या कामांची संख्या 182, तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आलेले कामांचे प्रस्ताव 71, कार्यवाही न केलेल्या कामांची संख्या 306 आणि तांत्रिक मान्यता देण्यात आलेली कामे 5 आहेत. त्यामुळे शेतकर्यांसाठी असलेली ही योजना शेतकर्यांच्याच अडचणीमुळे प्रत्यक्षात येताना अवघड झाली आहे.







