मात्तिया झाक्कानी इटलीचा तारणहार

। लायपझिग । वृत्तसंस्था ।

बदली खेळाडू मात्तिया झाक्कानी इटलीचा तारणहार ठरला. त्याने भरपाई वेळेतील अखेरच्या आठव्या मिनिटालस प्रेक्षणीय गोल केला. त्या बळावर विजयाच्या द्वारी असलेल्या क्रोएशियाला 1-1 असे गोलबरोबरीत रोखून गतविजेत्यांनी युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.

इटली व क्रोएशिया यांच्यातील सामन्याचा उत्तरार्ध रंगतदार, तेवढाच नाट्यमय ठरला. विश्रांतीनंतर लगेच इटलीचा बदली खेळाडू डेव्हिड फ्रात्तेसी याने चेंडू हाताळल्याबद्दल व्हीएआर पडताळणीनंतर क्रोएशियाला पेनल्टी फटका मिळाला. त्यांचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू लुका मॉड्रिच याच्या फटक्याचा इटालियन गोलरक्षक जाईनलुईजी डोन्नारुम्मा याने अचूक अंदाज बांधला आणि डावीकडे झेपावत चेंडू अडविला. गोल करण्याची हुकलेली सुरेख संधी मॉड्रिचने लगेच पुढच्या मिनिटाला मैदानी गोलने साधली. 55व्या मिनिटाला अँटे बुदिमिर याचा फटका डोन्नारुम्मा याने रोखल्यानंतर मॉड्रिचने क्रोएशियाला रिबाऊंडवर आघाडी मिळवून दिली. मात्र, 81व्या मिनिटाला मैदानात उतरलेला 29 वर्षीय झाक्कानी याने 90+8 व्या मिनिटास रिकार्डो कालाफिओरी याच्या साह्यावर अप्रतिम फटक्यावर गोल केला आणि इटलीने 1-1 अशी बरोबरी साधली.

Exit mobile version