| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघ हे दोन्ही मतदारसंघ आमचे बालेकिल्ले आहेत. सत्तेच्या राजकारणात तुम्ही आमची निवडणूक चिन्ह पळवून नेली असतील पण जनता पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार बहुमताने विजयी करण्यासाठी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपणच मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील आहोत असे समजून घराघरात पोहचावे असे आवाहन उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी केले.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या संपर्क कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, जिल्हा सल्लागार रियाज बुबेरे, शिवसेना तालुका संघटक बाबु घारे, माजी उप तालुकाप्रमुख शशिकांत मोहिते, उप तालुकाप्रमुख प्रमोद सुर्वे, जेष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच आवेश जुवारी आदी कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. जेष्ठ शिवसैनिक शशिकांत मोहिते यांनी आपली या निवडणुकीत कसोटी आहे. कसोटीच्या काळात सर्वांनी एकदिलाने पक्षाच्या मागे खंबीर राहिले पाहिजे. पक्षाला आज आपल्या एकजुटीची गरज असून कार्यकर्त्यांनी शेवटच्या मतदार पर्यंत जावून मशाल हे निवडणूक चिन्ह पोहचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहन केले.
मावळ लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सज्ज झाला आहे असा इशारा उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी विरोधकांना दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत.आपलें महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील कर्जत तालुक्यातून बहुमताने पुढे राहतील असा निर्धार व्यक्त करीत गाव – वाडे – पाड्यात – शहरात जाऊन जोरदार प्रचार करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. त्यासाठी प्रत्येक शिवसैनिक यांनी आपण स्वतः मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असल्या सारखे वागावे आणि मतदारांना सांगावे असे आवाहन सावंत यांनी केले. ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला असून त्याला इतर पक्षाची साथ असल्याने महा आघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना सर्व ताकद लावून बहुमताने निवडून आणणार यासाठी निर्धार केला.