शिंदे सरकारच्या विरोधात मविआचा मोर्चा

ठाकरे, पवारांची घोषणा

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यपाल आणि सत्ताधार्‍यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे. शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं जात आहे. सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी (दि.17) मुंबईत महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी (दि.5) मुंबईत केली.

हिवाळी अधिवेशनाच्या पाश्‍वर्र्भूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये मोर्चाचा हा निर्णय घेण्यात आला. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात अस्तित्वात आलेल्या बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता धुळीस मिसळत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडे जात आहेत. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गावांवर दावा केला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान धुळीस मिळत आहे. गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवली. पुढच्या वर्षी कर्नाटकची निवडणूक असल्याने राज्यातील उद्योग आता कर्नाटकला जाणार का? या सगळ्यावरून राज्यात मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्‍न पडतोय.

सरकारच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा अपमान होत असल्याने आता महाराष्ट्राच्या शक्तीचं विराट दर्शन दाखवलं पाहिजे. यामध्ये सर्वांनी सामिल व्हावं. हा केवळ राजकीय विषय नाही, तर राज्याच्या स्वाभिमानाचा प्रश्‍न आहे.

उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख

राज्यातील मोठमोठे उद्योग हे गुजरातला जात आहेत, हे या सरकारचं अपयश आहे. आम्ही नवीन उद्योग आणू असं म्हणणार्‍यांनी जे आहेत ते थांबवावेत.

अजित पवार
विरोधी पक्षनेते


वंचितही मविआत सहभागी?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीही सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून पुढाकार घेतला जात आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात खलबतं सुरु आहेत. मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या चर्चा झाल्याचे वृत्त आहे. आगामी मुंबई महापालिका, तसंच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पाश्‍वर्र्भूमीवर आंबेडकर-ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जात आ हे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर, तर वंचितकडून प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर बैठकीला हजर होते. याआधी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई आणि वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाच्या दोन बैठका झाल्याची माहिती आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर ठाकरे गट आणि वंचित यांच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बैठकीत युतीचा फॉर्म्युला ठरणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Exit mobile version