पनवेलमध्ये मविआच्या आंदोलनाचा धसका

मालमत्ता करामध्ये सुधारणा होणार
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 ग्रामपंचायती व 29 गावांच्या निवासी मालमत्ताधारकांनी महापालिकेने आकारलेल्या मालमत्ता कराच्या विरोधात महाविकास आघाडीने सुुरु केेलेल्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने नमतेपणाची भूमिका स्वीकारली आहे. या भागाचे पुनर्निरीक्षण व करनिर्धारण दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या कररचनेमुळे ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता करात 30-40 टक्क्यांनी घट होणार असल्याने 15 हजारांपेक्षा जास्त मालमत्ताधारकांना दिलासा मिळणार आहे.

पूर्वाश्रमीचे ग्रामपंचायत क्षेत्र (निवासी गावठाण क्षेत्र), झोपडपट्टी व दाटवस्ती असलेले क्षेत्र व आदिवासी पाडे, वाड्या व वस्त्या यांचे पुनर्निरीक्षण करण्याचे आदेश पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार येथील मालमत्ता कर कमी होण्याच्या दृष्टीने झोन क्र.3 मधून पूर्वाश्रमी ग्रामपंचायतीच्या गावठाण क्षेत्रातील निवासी मालमत्ता, आदिवासी पाडे, वाड्या व वस्त्या येथील निवासी मालमत्ता या झोन क्र.4 मध्ये वर्ग करण्यात आले आहे. तसा सुधारित आदेश आयुक्त यांनी 10 मार्च रोजी पारित केला आहे. या निर्णयामुळे वार्षिक घनकचरा शुल्क रुपये 600 मध्ये कपात करून 60 रुपये करण्यात आला असल्यामुळे या निर्णयाचा ग्रामपंचायत क्षेत्रातील 15 हजार 500 मालमत्ताधारकांना फायदा होणार आहे.

पूर्वाश्रमीचे ग्रामपंचायत क्षेत्र (निवासी गावठाण क्षेत्र), झोपडपट्टी व दाट वस्ती असलेले क्षेत्र व आदिवासी पाडे, वाड्या व वस्त्या यांचे पुनर्निरीक्षण करून करनिर्धारणामध्ये दुरुस्ती केल्याने त्यांचा मालमत्ता कर 30 ते 40 टक्क्यांनी कमी होणार आहे. याचा संबंधित क्षेत्रातील मालमत्ताधारकांनी फायदा घेऊन 31 मार्चच्या आत मालमत्ता कर भरून शहराच्या विकासाला हातभार लावावा. – गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल

Exit mobile version