एकेकाळी बहुसंख्य लोकांच्या जीवनात रेशन दुकान या संस्थेला फार महत्व होतं. गॅस मिळत नसे. त्यामुळे रॉकेलवरच अवलंबून राहावं लागे. खुल्या बाजारातली साखर भयंकर महाग असे किंवा मिळतच नसे. त्यामुळे या जिनसांसाठी रेशनचा रस्ता धरावा लागे. दिवाळी वगैरे सणांच्या काळात साखर, रॉकेल इतकंच काय रवा, मैदा यांचासुद्धा काळाबाजार होई. हा जमाना गेला. रॉकेल हद्दपार झालं. साखर सहज मिळते. शिवाय बराच काळ तिचे दर स्थिर आहेत. आता रेशन दुकानांवरची गर्दी कमी झाली. टंचाई हा शब्दही नामशेष झाला. समाज म्हणून आपण आता खूपच पुढे आलो. देशात पंचवीस ते पस्तीस कोटी लोक मध्यम वर्गात आहेत. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि इटली यांच्या एकत्रित लोकसंख्येहूनही ही संख्या अधिक आहे. या लोकांना महिन्याला ठराविक उत्पन्नाची हमी आहे. आज ते पैसे देऊन मनाला येईल त्या वस्तू खरेदी करू शकतात. ताणतणाव आणि अडचणी आहेतच. पण तरीही यांचं आयुष्य सुखवस्तू आहे. दिवाळीसारखे सण म्हणजे तर सुखवस्तू आयुष्यातही आणखी मौजमजा करण्याचे. ती करण्यासाठी बाजारपेठ त्यांना तर्हतर्हेची साधनं पुरवते. इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाण्यापिण्याच्या वस्तू, मनोरंजनाचे नवीन प्रकार. गेली दोन वर्षे काहीशी उदासीत गेली. कोरोना गरीब-श्रीमंत असा भेद करीत नसल्याने सर्वांचेच हाल झाले. पैसे आहेत पण ऑक्सिजन नाही किंवा इस्पितळात जागा नाही अशी स्थिती आली. जुन्या काळातल्या रेशन व्यवस्थेची आठवण करून देणारा तो प्रकार होता. शिवाय, तिथे साखरेशिवाय माणसाचा जीव जात नव्हता. इथं तसं नव्हतं. असो. मौजमजेकडे पुन्हा परतायला हरकत नाही असा काळ आला. त्या काळातली पहिली दिवाळी आली. बाजारात पुन्हा झगमगाट वाढला. वर्दळ वाढली. पण खरोखर खरेदी किती व कशाची वाढली हे पाहावं लागेल. अलिकडेच प्रसिध्द झालेल्या आकडेवारीनुसार अत्यंत महागड्या कार्सची विक्री जितकी वाढली आहे तितक्या प्रमाणात छोट्या मोटारींची किंवा दुचाकींची विक्री वाढलेली नाही. म्हणजे वरच्या स्तरातील सुखवस्तूंची आणखी मौजमजा करण्याची क्षमता शाबूत आहे. त्या मानाने खालच्या सुखवस्तू लोकांची ती नसावी. पण ते थोडीफार दिवाळी करतीलच. खरी अडचण दुसर्या एका वर्गाची आहे. त्यांचं उत्पन्न स्थिर नसतं. यात शेतकरी येतात तसंच स्वयंरोजगार किंवा छोटे उद्योग चालवणारे लोक येतात. यंदा यांची हालत थोडी कठीण आहे. कोरोनापासूनच्या मंदीमुळे अनेक छोटे उद्योग बंद आहेत. आणि शेतीचे हाल तर सर्वांसमोर आहेत. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला कपाशी आणि सोयाबीन ही दोन पिकं सोन्यासारखं उत्पन्न मिळवून देतील अशी आशा होती. पण परतीच्या पावसाने त्या आशेची माती केली. कालपर्यंत दिवाळीच्या बाजारपेठेत येऊ शकेल अशा अवस्थेतला शेतकरी आज बिगर-सुखवस्तू होऊन या पेठेच्या बाहेर फेकला गेला आहे. देशाच्या नाही पण निदान महाराष्ट्रातल्या दिवाळीवर तरी हा मोठा ओरखडा आहे. सुखवस्तूंची जबाबदारी अशी की त्यांनी आपल्या भावांची आठवण ठेवावी, त्यांना होता होईल ती मदत करावी. या निमित्ताने बदललेल्या हवामानाबाबतही चर्चा व्हायला हवीय. कारण यंदा अति-पावसानंच दिवाळीमध्ये मिठाचा खडा टाकलाय. गेल्या काही वर्षांपासून बिगरमोसमी आणि एका वेळी एखाद्या ठिकाणी ढगफुटीसारखा कोसळणारा पाऊस हा प्रकार वाढू लागलाय. आकाशात बसलेला देव हे काहीतरी घडवतो आहे असं म्हणून आपल्याला स्वस्थ बसण्यासारखं नाही. आपला निसर्ग, आपलं पर्यावरण आपणच घडवत असतो. अंतिमतः आपल्या छोट्या छोट्या सवयींचाच या पर्यावरणावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. पाण्याची बचत करणे, जमेल तितकी झाडे लावणे किंवा प्लास्टिकचा वापर टाळणे यासारख्या गोष्टीदेखील आपलं भावी पर्यावरण घडवण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. आपली मुलं दिवाळी आनंदानं साजरी करू शकतील की नाही हे त्यावरच अवलंबून असेल. हवेच्या प्रदूषणाइतकंच समाजातलं गैरविचारांचं आणि अंधश्रध्दांचं प्रदूषणही भयंकर वाढतंय. एकेकाळी फटाके लावू नका असं आवाहन सहज करता येऊ शकत होतं. आज अशा आवाहनाला धर्माच्या नावाने विरोध केला जातो. यंदाच्या दिवाळीत असे अनेक अंधःकार नाहीसे व्हावेत या शुभेच्छा.
अंधःकार दूर व्हावा

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026