माणगावचा अभिमान उंचावला
। माणगाव । प्रतिनिधी ।
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यशाची शिखरे गाठणाऱ्या मयूर बांगारा या होतकरू खेळाडूने फिल्ड आर्चरी क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन करत माणगावचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक 29 व 30 मार्च 2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या फिल्ड आर्चरी (कंपाउंड राउंड) राज्यस्तरीय स्पर्धेत 17 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अशोकदादा साबळे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, माणगावचा विद्यार्थी मयूर बांगारा याने उत्कृष्ट कामगिरी करत वैयक्तिक गटात तब्बल 4 सुवर्णपदके आणि सांघिक गटात 1 रौप्यपदक मिळवून एकूण 5 पदकांची कमाई केली. या दैदिप्यमान यशाच्या बळावर मयूरची राष्ट्रीय स्तरावरील फिल्ड आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली असून, हा माणगावसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे. ग्रामीण भागातून येऊन राष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या या खेळाडूने अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
मयूरच्या या यशामागे क्रीडाशिक्षक प्रा. डॉ. रावळे सर, वाढवळ सर तसेच विशेष मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक बाळू ढेबे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच मयूरने हे यश गाठले असल्याची भावना व्यक्त होत आहे. या यशाबद्दल माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. राजीवजी साबळे, सचिव कृष्णाभाई गांधी, स्कूल कमिटी चेअरमन नरेंद्रशेठ गायकवाड, सन्माननीय सदस्य मा. माजी आमदार अनिकेतभाई तटकरे नितीन बामगुडे, डॉ. आबासाहेब पाटणकर, ॲड. विनोद घायाळ तसेच नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे मॅडम यांनी मयूरचे विशेष कौतुक केले. याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक व प्राचार्य आर. एच. पाटील, उपमुख्याध्यापक दिलीप उभारे, उपप्राचार्य बिरादार, पर्यवेक्षक मिलिंद सोनावणे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही मयूरवर अभिनंदनाचा वर्षाव केला. राष्ट्रीय स्तरावरही मयूरने अशीच चमकदार कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व स्तरांतून त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत.






