| ठाणे | प्रतिनिधी |
ठाण्याचा मयुरेश कोटियन राज्यस्तरीय पॅराऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. पुणे आणि कोल्हापूर इथं झालेल्या या स्पर्धेत 100 मीटर रिंगिंग आणि लाँगजंप या दोन्ही प्रकारात त्यानं सुवर्णपदक पटकावून थक्क करणारी कामगिरी नोंदवली. त्याच्या या कामगिरीमुळं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
ठाण्यातील वाघबीळ इथं राहणारा 25 वर्षीय मयुरेश कोटियन लहानपणापासून धावण्याच्या शर्यतीत पहिला यायचा. श्री माँ स्नेहदीप शाळेच्या स्पेशल चाईल्ड वर्गात त्याचं शालेय शिक्षण झालं. ‘मुलगा स्पेशल चाईल्ड आहे म्हणजे भविष्य अंधारात’ असा विचार न करता कोटियन कुटुंबानं त्याच्या प्रत्येक क्षमतेला प्रोत्साहन दिले. दरम्यान, पॅराऑलिंपिक स्पर्धेबाबत माहिती मिळाल्यानंतर मयुरेशच्या कारकिर्दीला नवं वळण मिळालं. त्यानं व्यावसायिक पातळीवर सराव सुरु केला. नुकतेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय पॅराऑलिंपिक चॅम्पियनशिपमध्ये मयुरेशनं 100 मीटर रिंगिंग आणि लाँगजंप या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांचा दुहेरी नेम साधला. मयुरेशच्या या शानदार यशामागे नोशिओ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी सचिव व महासंचालक योगेंद्र शेट्टी, शिक्षक राजेंद्र जगताप आणि प्रशिक्षक दत्ता चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन, मेहनत व पाठबळ आहे.
पॅराऑलिंपिकमध्ये मयुरेशला डबल सुवर्णपदक
