2000 कोटींची करणार गुंतवणूक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीतर्फे महाराष्ट्रातील जेएसडब्ल्यू डोल्वी वर्क्स या कारखान्यात जागतिक दर्जाची प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यासाठी रु.2000 कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक करण्यात येणार आहे. डोल्वीचा कारखाना हा जेएसडब्ल्यू स्टीलचा दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा एकात्मिक स्टील-उत्पादन कारखान असून, त्याची क्षमता 10 एमटीपीए इतकी आहे. कंपनीच्या भारतातील एकूण स्टील क्षमतेच्या 38 टक्के स्टील क्षमतेची हाताळणी या कारखान्यातून करण्यात येते.
या गुंतवणुकीमुळे जेएसडब्ल्यू स्टीलला आपला पर्यावरणीय कामगिरी सुधारण्यास, चक्रीय अर्थव्यवस्थेचा स्तर उंचावण्यात आणि जेएसडब्ल्यू स्टीलची महत्त्वाची वातावरणीय बदल लक्ष्ये साध्य करण्यात मोठ्या प्रमाणावर योगदान देण्यात मदत होईल. प्रदूषण नियंत्रण उपाययोजना टप्प्या-टप्प्याने राबविण्याचे कंपनीनेच नियोजन आहे आणि जागतिक मापदंडांशी सुसंगत अशी या कारखान्यांची कामगिरी उंचावण्याची अपेक्षा आहे.
याबाबत गजराज सिंग राठोड म्हणाले, शाश्वतता आमच्या सर्व व्यवसायांच्या आणि कारखान्यांचा गाभा आहे. आमच्या पर्यावरणीय कामगिरीमध्ये सुधारणा आणण्यासोबत आमच्या वातारवणीय बदल अजेंड्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. गेल्या पाच वर्षांत आमच्या पर्यावरण व शाश्वतता टीमने या प्रवासात बर्यापैकी प्रगती साधलेली आहे. यात स्रोत क्षमतेत सुधारणा, डिकार्बनायझेशन, किमान उत्सर्जन करणार्या इंधनांचा वापर, कचर्यापासून संपत्ती धोरणांची अंमलबजावणी इत्यादी उपाययोजनांचा समावेश आहे. आम्ही केलेली रु.2000 कोटींची गुंतवणूक आमच्या उत्पादनातून होणार्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांची द्योतक आहे. यामुळे आमच्या डोल्वी वर्क्स कारखान्याच्या परिसरात जीवनमानाचा दर्जा व पर्यावरण यात सुधारणा घडवून आणण्यास मदत करेल. यापैकी काही यंत्रणा बसविण्यासाठी आम्ही पहिल्या टप्प्यात सुमारे रु. 800 कोटी खर्च केले आहेत.