भात कापणी होणार स्वस्त, वेळेचा पैशाचीही होणार बचत
| माणगाव | वार्ताहर |
कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत असतांना त्यासाठी लागणारे मनुष्यबळही मजूर दुर्मिळ होऊ लागले आहेत. त्यामुळे शेती करणे परवडेनाशी झाली असून शेतकरी चांगलाच अडचणीत येत आहे. यंदा भातलावणी उशिरा झाल्यामुळे भातकापणी ही तब्बल 15 दिवस उशिरा होणार आहे. हळवे व वेळेत लागवड केलेले भातपीक कापणीसाठी तयार झाले आहे. या शेतीच्या कामावर कमी मजूर व कमी वेळ व कमी खर्चात कसे जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल यासाठी पिकांच्या उत्पादनासह त्यावर होणारा खर्च ही कमी करण्यासाठी नवनवीन प्रयोग शासनाकडून सुरु आहेत. या पिकांच्या काढणीसाठी मजूर दुर्मिळ झाले असून भातपीक शेतात काढणीसाठी तयार झाले आहे.
अद्याप पाऊस गेला नसल्याने शेतकरी भात कापणीसाठी द्वीधा मनस्थितीत आहे. जे मिळेल ते मजूर किंवा घरातीलच लहान थोर मंडळी नजीकच्या काळात भात कापणीच्या तयारीला लागणार आहेत. तर कांही शेतकरी मजूरच कामावर मिळत नसल्यामुळे पुरता चिंतेत सापडला आहे. आधुनिक यांत्रिकीकरणामुळे ही भात पिक कापणी स्वस्त झाली असून याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. माणगाव तालुक्यातील भातपीक पूर्ण तयार झाले असून ते कापणीलायक झाले आहे. माणगाव तालुक्यात यंदाचे वर्षी 12500 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड खरीप हंगामात केली होती. यावेळी भाताचे सुधारित व संकरित भाताच्या सुप्रीम व सुपर सोना, कर्जत 3, कर्जत 4, कर्जत 5, कर्जत 7, जया, रत्न, सुवर्णा, रत्नागिरी, अजया ह्या जाती तर संकरित वाणात सह्याद्री 3, सह्याद्री 4, या जातीची पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली असून हे पिक पूर्ण कापणीसाठी तयार झाले आहे.
या पिकाची कापणी ती ही वेळत व्हावी यासाठी शेतकरी हाताला मिळेल तो मजूर घेऊन कापणीसाठी सज्ज झाला आहे. सध्या कमी मजुरांची संख्या होऊ लागल्याने त्यांचे समोर मोठा प्रश्न उभारला आहे. कांही शेतकऱ्यांनी या मजूरावर अवलंबून न राहता आपल्याच घरातील भावकीची कांही मंडळी घेऊन भात कापणी सुरु केली आहे. आधुनिक यांत्रिकीकरणामुळे सुधारित पद्धतीने भातकापणी केल्यास शेतकऱ्यांची कमी वेळात, कमी खर्चात भातपीक कापणी होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.







