| कर्जत | प्रतिनिधी |
मजुरांची कमतरता आणि मजुरीचे वाढते दर लक्षात घेता शाश्वत भातशेतीसाठी यांत्रिकीकरणाची कास धरणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी. यू. शहारे यांनी केले.आदिवासी उपयोजना, अखिल भारतीय समन्वित बियाणे (पिके) योजनेंतर्गत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथी गृह सभागृहात आयोजित भात पीक बीजोत्पादन प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने, तालुका कृषी अधिकारी आर. ए. शिंदे उपस्थित होते.
डॉ. शहारे यांनी भात लावणीपासून कापणीपर्यंत लागणाऱ्या विविध यंत्रांची माहिती देत अल्प खर्चाची, कमी कष्टाची व फायदेशीर शेतीसाठी यांत्रिकीकरणाचे विविध पैलू समजावून सांगितले. तर डॉ. वाघमोडे यांनी जमिनीच्या प्रकारानुसार भात जाती कशा निवडाव्यात, पोषणमूल्ये असलेल्या तसेच भाकरी, पोहे, मुरमुरे, जेवणाचा आस्वाद वाढविणाऱ्या वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये असलेल्या भात जातींचा कसा वापर करावा, हे पटवून दिले. यावेळी आदिवासी उपयोजनेंतर्गत शिलारवाडी, खरबाची वाडी, खोंडेवाडी व नागेवाडीच्या पाच गटाला मनुष्यचलित भात लावणी यंत्र, नॅपसॅक स्प्रे पंप, तसेच 50 शेतकऱ्यांना युरिया ब्रिकेट्स, वैभव विळे, पॉकेट डायरी, घडीपत्रिकांचे वितरण डॉ. शहारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. डॉ. महेंद्र गवई, डॉ.मीनाक्षी केळुस्कर, डॉ.देवदत्त जोंधळे, डॉ. वैशाली सावंत, डॉ.राजेंद्र सावळे यांनी मार्गदर्शन केले.







