। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीतील राज्य कुस्ती स्पर्धेत निवड झालेल्या तसेच कांस्यपदक विजेत्या प्राची भोईर व मुंबई विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावित आंतरविद्यापीठ स्पर्धेत निवड झालेल्या ओंकार पवार, प्रांजली कुंभार, पायल मंरागजे या कुस्तीपटूंचा खोपोली नगरपरिषदेकडून सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी अनुप दुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याबाबतची संकल्पना खोपोली शहर कुस्ती तालीम संघाचे उपाध्यक्ष नगरसेवक किशोर पानसरे यांनी मांडली होती.
खोपोली नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी दालनात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रशासक, मुख्याधिकारी अनुप दुरे, खोपोली शहर कुस्ती तालीम संघाचे उपाध्यक्ष नगरसेवक किशोर पानसरे, कुस्ती संघाचे सुभाष घासे, माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक कुलदीपक शेंडे, रमेश जाधव, कुस्ती पंच जिल्हा सदस्य सुनील नांदे, उपमुख्याधिकारी पी.ए. साळवी आदी उपस्थित होते.
यावेळी पुरूष कुस्तीगीर- संकेत कुंभार (57 कि.), सुनील खंडागळे (70 कि), जयेश खरमारे (74 कि.), ओमकार पवार (92 कि.), ग्रिकोकुस्ती-1 गुलशन चौराशिया (55कि.), दिवेश पालांडे (79 कि.), महिला कुस्तीतगीर- सायली कुंभार (55 कि.), रोशनी परदेशी (57 कि.), प्रांजली कुंभार (59 कि.), प्राची भोईर (65 कि.), रूतुजा खंडागळे (68 कि.), नेहा पाटील (72 कि.), सानिका सूर्यवंशी (76 कि.), पायल मरागजे (50 किलो) यांचा मुख्याधिकारी दुरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
गरीब होतकरू कुस्तीगीरांसाठी नगरपालिकेने खावटीची देण्याची मागणी नगरसेवक किशोर पानसरे यांनी करीत कुस्तीगीरांना प्रशिक्षणासाठी जातीने लक्ष घालणारे राष्ट्रीय कुस्ती खेळाडू सुभाष घासे यांचे विशेष कौतुक केले. खोपोलीचे नाव कुस्तीगिरांनी राज्यपातळीवर नेल्याबद्दल मुख्याधिकारी दुरेंनी खेळाडूंचे अभिनंदन केले. कुस्तीगीरांना प्रोत्साहन देत सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार सुभाष घासे यांनी मानले.